म. टा. प्रतिनिधी, पुणे : देशभरात येत्या बुधवारी (३० ऑगस्ट) राखी पौर्णिमेचा सण साजरा होत आहे. राखी पौर्णिमा जवळ आल्यानंतर राखी बांधण्यासाठी नक्की काय मुहूर्त आहे, याची सर्वत्र चर्चा सुरू होते. मात्र राखी पौर्णिमेच्या पारंपरिक सणाला भावाच्या हातावर राखी बांधण्यासाठी कोणत्याही वेगळ्या मुहूर्ताची आवश्यकता नाही, अशी माहिती ‘दाते पंचांगकर्ते’चे मोहन दाते यांनी दिली आहे.
रक्षाबंधन हा सण विवाह, मूंज अथवा वास्तुशांत याप्रमाणे मंगल कार्य नसून सामाजिक आणि कौटुंबिक उत्सव आहे. त्यामुळे बुधवारी भद्रा काल असला तरी दिवसभरात आपल्या सोयीने केव्हीही रक्षाबंधन साजरे करता येईल, असं मोहन दाते यांनी स्पष्ट केलं आहे.

पूर्वी राखी पौर्णिमेचा अर्थ बहिणीने भावाला राखी बांधणे एवढाच अभिप्रेत नव्हता. त्याकाळी रक्षाहोमाद्वारे रक्षासूत्र तयार करून ते राजाला बांधले जायचे. अशा पद्धतीने रक्षाबंधन विधिवत करण्यासाठी भद्राकाल वर्ज्य केला जात असे. ज्यांना विधिवत रक्षाबंधन करावयाचे आहे त्यांनी भद्राकाल म्हणजेच रात्री ९ वाजून २ मिनिटांनंतर रक्षाबंधन साजरे करावे. राखीपौर्णिमा हा बहीण-भाऊ, मित्र, समाजबांधव यांच्यातील सामाजिक सलोखा राखणारा उत्सव असल्याने तो मोठ्या उत्साहाने साजरा करावा, असे दाते यांनी सांगितले.