राज्यातील करोनाच्या स्थितीवरून विरोधक सातत्यानं मुख्यमंत्री ठाकरे यांना लक्ष्य करत आहेत. ‘घरात बसून राहणारे हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत,’ अशी टीका भाजप नेते करत आहेत. पुण्यात टीव्ही पत्रकाराच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर मनसेनंही मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं होतं. मुख्यमंत्री कुठे आहेत? ते कधी बाहेर पडणार आहेत? कधी लोकांना दिलासा देणार आहेत?, असे प्रश्न मनसेनं उपस्थित केले होते. विरोधकांच्या या टीकेला उत्तर देताना शिवसेनेचे खासदार यांनी विरोधकांना टोला हाणला होता. ‘सध्या पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाची पद्धत सारखीच आहे, हे विरोधकांनी लक्षात घ्यायला हवं. पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्यांच्या कार्यालयात बसून काम करतात. ही काळाची गरज आहे. मुख्यमंत्रीही त्यांच्या कार्यालयात बसून सर्व यंत्रणांवर लक्ष ठेवून आहेत. बाहेर पडून एका ठिकाणी जाण्यापेक्षा एका ठिकाणी राहून दहा ठिकाणची कामे मार्गी लागत असतील तर ते अधिक फायद्याचं आहे,’ असंही ते म्हणाले होते.
वाचा:
उद्धव ठाकरे व मोदी यांच्या कामाची राऊत यांनी केलेली तुलना भाजपला रुचलेली नाही. त्यामुळंच भातखळकर यांनी तात्काळ राऊतांना उत्तर दिलं आहे. ‘कार्यकारी संपादक उद्धवजींची तुलना ब्रह्मदेवाशीही करू शकतात. बाकी सत्य काय ते महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊकच आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे. ‘मोदीजी फक्त चार तास झोप घेतात, तेवढा वेळ तरी काम करा,’ असा चिमटाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना काढला आहे.
‘मुख्यमंत्री घरी बसणारा नको, असा समोर येऊन लढणारा हवा,’ असं म्हणत भातखळकर यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा पूरग्रस्त भागाची पाहणी करतानाचा फोटोही ट्वीट केला आहे.
दुसऱ्या एका ट्वीटमधून भातखळकर यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही लक्ष्य केलं आहे. ‘आदित्यजी, आपण उपनगराचे पालकमंत्री आहात, लोक आपल्याला शोधत आहेत. कधी तरी वेळ काढून इथल्या हॉस्पिटलची, आरोग्य व्यवस्थेची पाहणी करा. लोकांची परिस्थिती ठाकरे सरकारच्या काळात किती केविलवाणी झालीय ते लक्षात येईल,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times