पुणे : वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांचे बदलते स्वरूप या पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्यांच्या मनुष्यबळ निकषांत बदल करण्यात आले असून, त्यानुसार पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रत्येक पोलिस ठाण्याला चार निरीक्षक मिळणार आहेत. यामध्ये एक निरीक्षक पोलिस ठाण्याचा प्रभारी अधिकारी असेल, तर एका निरीक्षकावर सायबर पथकाची जबाबदारी असेल. ग्रामीण भागांत पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस ठाण्यांमध्ये एका निरीक्षकासह तीन सहायक निरीक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालय वगळून अन्य ठिकाणी पोलिस ठाण्यांची निर्मिती करताना १९६० मधील निकषांचा आधार घेतला जात होता. त्यानुसार मनुष्यबळाला मंजुरी दिली जात होती. गेल्या ६३ वर्षांत बदललेली सामाजिक, भौगोलिक आणि आर्थिक परिस्थिती, वाढती लोकसंख्या, शहरीकरण, समाज माध्यमांचा प्रसार, गुन्ह्यांचे बदललेले स्वरूप या पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्यांची फेररचना करण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने नुकताच घेतला आहे. हे निकष ठरविताना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील ‘ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ या संस्थेच्या अहवालातील शहरी आणि ग्रामीण पोलिस ठाण्यांसाठी निश्चित केलेल्या मापदंडाचा अभ्यास करण्यात आला. राज्यातील ११ पोलिस आयुक्त कार्यालये आणि ३७ अधीक्षक कार्यालयांना नवीन निकषांनुसार रचना करून प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला आहे.

Maharashtra Rain: शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या, पावसाअभावी १५ जिल्ह्यांमधील खरिपाची पिके धोक्यात
५० हजार लोकसंख्येमागे चौकी

  • पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील पोलिस चौक्यांचीही फेररचना करण्यात येणार आहे.
  • प्रत्येकी ५० हजार लोकसंख्येमागे एक पोलिस चौकी असावी, असे धोरण ठरवण्यात आले आहे.
  • प्रत्येक चौकीला एक सहायक निरीक्षक किंवा उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी प्रमुख असेल.
  • चौकीतील एकूण मनुष्यबळ १० असेल.

उपनिरीक्षक ठाणे अंमलदार

शहर पोलिस आयुक्तालयाच्या रचनेनुसार सध्या पोलिस ठाणे अंमलदार म्हणून सहायक उपनिरीक्षक किंवा पोलिस हवालदार यांची नेमणूक केलेली असते. पोलिस ठाण्यात येणाऱ्या तक्रारींची नोंद या अंमलदारांकडून घेतली जाते. नवीन निकषानुसार प्रत्येक पोलिस ठाण्याला अंमलदार म्हणून दोन उपनिरीक्षक नेमण्यात येणार आहेत. तसेच त्यांना मदतनीस म्हणून दोन हवालदार आणि सहा शिपाई असतील.

ब्रेक फेल PMPचा चांदणी चौक परिसरात थरार; बस थेट खड्ड्यात पडली, काय घडलं?
असे असेल तपास पथक

तपास पथकामध्ये ५० गुन्ह्यांसाठी एका सहायक निरीक्षकासह दोन उपनिरीक्षक आणि एक सहायक उपनिरीक्षक यांचा समावेश असेल. तर, पुढील प्रत्येक ५० गुन्ह्यांच्या तपासासाठी एक उपनिरीक्षक, एक सहायक उपनिरीक्षक आणि एक हवालदार अशी वाढ करण्यात येईल. त्यानुसार पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या एकूण गुन्ह्यांचा आढावा घेऊन तपास पथकासाठीचे मनुष्यबळ निश्चित करण्यात येईल.

प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबर पथक

ऑनलाइन फसवणूक असो की समाज माध्यमातून होणारी बदनामी, सायबर गुन्हे मोठ्या संख्येने घडत आहेत. राज्यभरात सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठीची यंत्रणा तोकडी आहे. त्यामुळे प्रत्येक पोलिस ठाण्यात एक सायबर पथक नेमले जाणार असून, निरीक्षकाकडे या पथकाचा पदभार असणार आहे.

शेतकऱ्याची कृतज्ञता! पोराप्रमाणे सांभाळलेल्या गाईचे निधन; बैलगाडीतून अंत्ययात्रा काढत विधीवत अंत्यसंस्कार

राज्य सरकारच्या निर्णयानुसार नवीन निकषांच्या आधारे पोलिस ठाण्यांच्या मनुष्यबळाची फेररचना करून, आवश्यकतेनुसार मनुष्यबळ वाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात येईल.

– अरविंद चावरिया (अतिरिक्त पोलिस आयुक्त, प्रशासन, पुणे पोलिस)

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादा पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवडमध्ये; कार्यकर्त्यांकडून डोळे दिपवणारा स्वागत सोहळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here