शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं मुंबईत येऊ नये, असं म्हटलं होतं. त्याला कंगनानं ट्विटरवरून प्रत्युत्तर दिलं आहे. ‘संजय राऊत यांनी मला जाहीर धमकी दिली असून पुन्हा मुंबईत येऊ नकोस, असं धमकावलं आहे. मुंबईच्या रस्त्यांवर आजादी ग्रॅफिटी आणि आता ही जाहिर धमकी, मला मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे, असा सवाल कंगनानं तिच्या ट्विटमध्ये केला आहे. यावरूनच भाजप नेते यांनी संजय राऊत आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
भाजप नेते राम कदम यांनी कंगनाचं ट्विट रिट्विट केलं आहे. ‘शिवसेना नेत्याचं पुन्हा एकदा निंदनीय विधान. महाविकास आघाडीनं मुंबई पोलिसांवर स्वतःच्या स्वार्थासाठी दबाव आणला आहे. जेणेकरून सुशांतला न्याय मिळू नये. त्यांचा उद्देशच बॉलिवूड ड्रग माफियांना संरक्षण देण्याचा आहे आणि कंगना झाशीची राणी आहे. जी या धमक्यांना घाबरत नाही,’ असं म्हणत राम कदम यांनी कंगनाची पाठराखण करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, राम कदम यांनी जरी कंगनाची पाठराखण केली असली तरी भाजप नेते निलेश राणे यांनी मात्र कंगनाचा समाचार घेतला आहे. मुंबई पोलिसांवर केलेल्या टीकेनंतर निलेश राणे यांनी ‘काही अधिकारी दबाला बळी पडले म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी ठरत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांचा अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्याइतकी कंगना राणावत कोण लागून गेली?’, असा सवाल उपस्थित केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times