मुंबई : मंत्री धनंजय मुंडे यांनी आयोजित केलेल्या बीडच्या सभेत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सडकून प्रहार केले. तेलगी प्रकरण, पहाटेचा शपथविधी ते दादांचं नेतृत्व यावरून भुजबळांनी फटकेबाजी करताना शरद पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. संपूर्ण भाषणात भुजबळांनी पवारांना टार्गेट केलं. आधीच लांबलेल्या भाषणाला उपस्थित कंटाळले होते. त्यात भुजबळ एकामागून एक पवारांवर वार करत राहिले. हाच धागा पकडून आमदार रोहित पवार यांनी छगन भुजबळांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधलाय. पवारसाहेबांच्या विरोधात सूर निघाल्याने उपस्थित बीडकरांनी गोंधळ केला, त्यामुळे पुढच्या २ मिनिटांत त्यांना भाषण गुंडाळावं लागलं, अशी टीका रोहित पवार यांनी केली.

‘सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची… अस्मितेची… सन्मानाची अन् दुष्काळ मिटवण्यासाठीची… अशी टॅगलाईन वापरून धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये जंगी सभेचं आयोजन केलं होतं. या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे सगळे मंत्रिगण उपस्थित होते. भव्यदिव्य रॅलीने अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे स्वागत करण्यात आले. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अभिवादन केले. जिल्ह्यातील आमदारांची भाषणं संपन्न झाल्यावर प्रमुख नेत्यांनी भाषणं केली. यात भुजबळांनी पवार यांच्यावर बोचरे वार केले. त्यांच्या याच भाषणाविरोधात राष्ट्रवादीचा पवार गट आक्रमक झाला आहे. भुजबळांच्या भाषणाविरोधात आज पवार गटाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

भाषण लांबलं, उपस्थितांचा धिंगाणा, भुजबळांवर भाषण आवरतं घेण्याची वेळ, बीडमध्ये काय घडलं?
रोहित पवार यांची भुजबळांवर टीका

बीडमध्ये मोठं स्वागत झालं पण एका मंत्र्याने त्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर केला, हेही नजरेआड करता येणार नाही. या सभेत जेव्हा आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात एका मंत्र्याचे सूर निघायला लागले त्याला लोकांनीच विरोध केल्याने संबंधित मंत्र्याला दोन मिनिटांत आपलं भाषण गुंडाळावं लागलं.


बाकी संपूर्ण सभेत जेव्हा भाजपाची आरती गायली गेली तेव्हा बारामतीप्रमाणेच स्वाभिमानी बीडकरांनीही एकही टाळी वाजवली नाही आणि खुर्च्याही रिकाम्या व्हायला लागल्या, यातच सर्व आलं… कारण बारामती असो किंवा बीड… संपूर्ण महाराष्ट्रातील जनता हुशार आणि स्वाभिमानी आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.

मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी सरकारची तिजोरी खुली करु; बीडकरांना उपमुख्यमंत्रांचा शब्द
भुजबळांनी पवारांना कसं टार्गेट केलं?

तेलगी प्रकरणात माझ्यावर आरोप झाले तर माझा राजीनामा घेतला गेला, पण खैरनार यांनी आरोप केल्यावर शरद पवार यांनी राजीनामा का दिला नाही? असा थेट सवाल भुजबळांनी पवारांना विचारला. तुम्हीच नेहमी भाजपसोबत सत्तेसाठी बोलत राहिलात, पहाटेचा शपथविधी करायला लावलात, मग आता तोच निर्णय घेतला तर आमच्यावर हल्ले कशासाठी करता? अशी विचारणाही भुजबळांनी पवारांना केली.

दुसरीकडे आम्ही विकासासाठी दादांसोबत आलो. मग आमच्यावर हल्ले का करता? साहेब तुम्ही डबल मिनिंग शब्द कधीपासून वापरायला लागलात. तुम्ही आम्हाला शिकवलं कुणाविषयी व्यक्तिगत बोलायचं नाही आणि तुम्हीच आज बोलत आहात, असेही छगन भुजबळ म्हणाले.

आजचा प्रचंड जनसमुदाय बघता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्या पाठीशी आहे, असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला. धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि माझ्या विरोधात बोलले जाते मग बारामतीचा मुद्दा आला की अजितदादा आमचे नेते आहेत असे बोलले जाते. जर तुम्हाला ते तुमचे नेते आहे असे वाटते तर मग ते पक्षाचे उपमुख्यमंत्री आहेत हे जाहीर करा, असा जोरदार टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला.

छगन भुजबळांचं भाषण लांबलं, बीडकरांचा संयम सुटला; गोंधळामुळे भाषण गुंडाळण्याची वेळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here