मुंबई : देशातील लोकसभा निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी २६ राजकीय पक्षांनी एकत्र इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जदयू आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राजदच्या वतीनं पाटणा येथे पहिल्या बैठकीचं आयोजन केलं होतं. त्यानंतर कर्नाटक राज्यात इंडिया आघाडीची दुसरी बैठक पार पडली होती. पहिल्या बैठकीला जवळपास १५ राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. दुसऱ्या बैठकीत २६ राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहिले होते. आता तिसरी बैठक मुंबईत पार पडणार आहे. या बैठकीचं आयोजन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आलं आहे.

तिसऱ्या बैठकीचं वेगळेपण काय आहे?

इंडिया आघाडीची पहिली बैठक बिहारमध्ये पार पडली. बिहारमध्ये जदयू आणि राजदचं संयुक्त सरकार आहे. तर, दुसरी बैठक काँग्रेसशासित कर्नाटक राज्यात पार पडली. तिसरी बैठक मुंबईत म्हणजेच महाराष्ट्रात होत आहे. ही पहिली बैठक असणार आहे जिथं इंडिया आघाडीतील घटकपक्ष सत्तेत नाहीत. त्यामुळं या बैठकीत काय निर्णय होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दुसऱ्या बैठकीत नाव मिळालं तिसऱ्या बैठकीत काय मिळणार?

२६ राजकीय पक्षांची बैठक कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये पार पडली होती. त्या बैठकीत आघाडीला नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. इंडियन नॅशनल डेव्हलमेंटल इन्क्लुझिव अलायन्स असं नाव सर्वांच्या संमतीनं देण्यात आलं. या नावाचं लघूरुप म्हणून इंडिया असा उल्लेख केला जाऊ लागला. यानंतर त्यावरुन राजकारण देखील रंगलं होतं. दुसऱ्या बैठकीत आघाडीला नाव मिळाल्यानंतर तिसऱ्या बैठकीत इंडिया आघाडीचा लोगो जाहीर करण्यात येणार आहे. या लोगोचं अनावरण ३१ ऑगस्ट रोजी करण्यात येईल.

इंडिया आघाडीला नवे मित्र मिळणार?

पाटणा येथील बैठकीला १५ राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. तर, कर्नाटकमधील बैठकीला २६ राजकीय पक्ष उपस्थित होते. महाराष्ट्रातील बैठकीत या मित्रपक्षांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यांच्यासह महाराष्ट्रातील छोट्या राजकीय पक्षांनी एकत्र येत प्रागतिक विचारमंचची स्थापना केली होती. यामध्ये शेकापसह विविध राजकीय पक्षांचा समावेश होता. हे पक्ष देखील इंडिया आघाडीत सहभागी होऊ शकतात. मात्र, राजू शेट्टी यांनी नाना पटोलेंनी आमंत्रण दिल्याचं म्हटलं होतं मात्र निर्णय जाहीर करण्यात आला नव्हता. त्यामुळं मुंबईतील बैठकीत नवे मित्र मिळणार का हे देखील पाहावं लागेल. दुसरीकडे उत्तर भारतातील काही पक्ष देखील या बैठकीच्या निमित्तानं पहिल्यांदा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी करुन घेण्यासंदर्भात चर्चा होणार का हे पाहावं लागेल. वंचित आणि शिवसेना ठाकरे गटाची यापूर्वीच युती झालेली आहे.

लोगोचं अनावरण होणार

मुंबईतील बैठकीत इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण केलं जाणार आहे. हा लोगो देशातील १४० कोटी जनतेच्या एकतेचं प्रतीक असेल, असं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले होते.
Mumbai Local: हार्बर लोकलबाबत मोठी बातमी; अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न अखेर निकाली, वक्तशीरपणा वाढणार!

जागा वाटप, समन्वय समिती, संयोजक पदाचा निर्णय होणार?

इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची घोषणा आणि संयोजक पदाची घोषणा मुंबईतील बैठकीत होईल, असं कर्नाटकमधील बैठकीत सांगण्यात आलं होतं. आता मुंबईतील बैठकीत समन्वय समितीत कुणाची वर्णी लागणार, संयोजकपद कुणाकडे जाणार हे पाहावं लागणार आहे. याशिवाय महत्त्वाचा मुद्दा असलेला लोकसभेसाठी जागा वाटपाचा निर्णय यावर हे पक्ष कसा मार्ग काढतात हे देखील या बैठकीतून समोर येईल.

शिर्डीच्या जागेवरुन नवा पेच, मातोश्रीवर खडाजंगी;बबनराव घोलप तातडीनं उद्धव ठाकरेंच्या भेटीला, काय घडलं?

मुंबईतील नियोजन कसं असणार?

३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आलेल्या नेत्याचं स्वागत केलं जाईल. त्यानंतर सायंकाळी ६.२० ते ८.३० या वेळेत अनौपचारिक बैठक पार पडेल. त्यानंतर ८.३० ला इंडिया आघाडीची डिनर डिप्लोमसी असेल. उद्धव ठाकरेंकडून इंडिया आघाडीच्या नेत्यांसाठी डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे.

१ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २ च्या दरम्यान इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडेल. लंच नंतर सायंकाळी ३.३० वाजता पत्रकार परिषद पार पडेल.

इंडिया आघाडीच्या बैठकीला पंजाब, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, झारखंड या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामध्ये भगवंत मान, अरविंद केजरीवाल, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन, हेमंत सोरेन यांची उपस्थिती असेल. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी देखील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती दिली.
नीरजला सुवर्णपदक जिंकवणारा एक भाला आहे किती रुपयांना, जाणून गोल्डन javelin ची किंमत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here