पाकिस्तानने भारताविरूद्ध छुपे युद्ध छेडले आहे. पण त्यात पाकला कायम अपयशी ठरेल, असं रावत म्हणाले. पाकिस्तान भारताविरूद्ध छुपे युद्ध करत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीशिवाय भारताच्या इतर भागातही दहशतवाद पसरवण्याचा पाकचा प्रयत्न आहे. उत्तर सीमेवर भारतासमोर समस्या निर्माण करण्याचा पाकचा डाव आहे. पण त्यात पाक अपयशी ठरेल आणि मोठं नुकसान सहन करावं लागेल, असं रावत म्हणाले.
पश्चिम आणि पूर्वेकडील सीमेवर पाकिस्तान आणि चीनचा एकचवेळी हल्ला करण्याच्या धोक्याचा रावत यांनी उल्लेख केला. दोन्ही सीमांवर उत्तर देण्यासाठीच्या तयारीवर आम्ही विचार केला आहे. भारतीय सैन्य दलांनी कुठल्याही संकटाला तोंड देण्यासाठी तयार असले पाहिजे आणि सोबतच भविष्यासाठीही तयारी ठेवली पाहिजे, असं रावत म्हणाले.
सीमेवर आम्हाला शांतता हवी आहे. पण अलीकडेच सीमेवर चीनच्या काही आक्रमक कारवाया आमच्या लक्षात आल्या आहेत. त्यांना चोख उत्तर देण्याची क्षमता आमच्यात आहे, असं जनरल रावत यांनी स्पष्ट केलं.
भारत-अमेरिकेत सामरिक भागीदारीबाबतही जनरल रावत यांनी माहिती दिली. भारत आणि अमेरिकेच्या संबंध उभय देशांमध्ये झालेल्या चर्चेने अधिक बळकट झाले आहेत. दोन्ही देश हिंद प्रशांत महासागराच्या सुरक्षेसाठी प्रयत्नशील आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या भारत भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये ३ अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार झाला होता. यानुसार भारत अपाचे हेलिकॉप्टर, चिनूक अशी अमेरिकन संरक्षण सामग्री घेईल. आता अमेरिकेने सतत संपर्कात राहून माहिती देत राहवी, अशी आमची अपेक्षा आहे’, असं जनरल रावत म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times