म .टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर: भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. असे असतानाच, या रुग्णालयात नियुक्तीवर असलेले तीन डॉक्टर मागील काही आठवड्यांपासून रुग्णालया सातत्याने गैरहजर आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, सरकारकडून त्यांच्या बँक खात्यात वेतनदेखील जमा केले जात असल्याची बाब आता समोर आली आहे.

भाईंदर पश्चिमेला असलेल्या जोशी रुग्णालयावर हजारो सर्वसामान्य नागरिक अवलंबून आहेत. यात मिरा-भाईंदरसह वसई-विरार व इतर शहरांतील नागरिकांचाही समावेश आहे. येथे उपचारासाठी आवश्यक यंत्रणा असली, तरी तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. परिणामी रुग्णालयात केवळ प्राथमिक उपचार व किरकोळ शस्त्रक्रिया केल्या जात असून गंभीर उपचारांसाठी रुग्णांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयांत दाखल व्हावे लागते आहे.

बच्चू कडूंची सरकारी रुग्णालयाला अचानक भेट, शल्यचिकीत्सकाला धारेवर धरलं

आधीच अशी परिस्थिती असताना, या रुग्णालयात राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून नियुक्ती करण्यात आलेले तीन तज्ज्ञ डॉक्टर मागील दीड महिन्यांपासून गैरहजर आहेत. या डॉक्टरांची दैनंदिन हजेरी लावली जात असून त्यांचे वेतनदेखील सरकारकडून अदा केले जात असल्याची बाब समोर आली आहे. आमदार गीता जैन यांनी सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. संबंधित डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणीही आमदार जैन यांनी केली.

नोटिसा बजावणार

यावर संबंधित डॉक्टरांना नोटिसा बजावल्या जाणार असल्याचे जिल्हा शैल्य चिकित्सक डी. कैलास पवार यांनी सांगितले. या डॉक्टरांची कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून हजेरी लावली जात असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांकडून देण्यात आली.

दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिल्यास कारवाई

जोशी रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्ण आल्यास, अनेकदा उपचारांची सुविधा नसल्याचे सांगत त्याला दाखलच करून न घेता दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. परिणामी, रुग्णाच्या नातेवाईकांची तारांबळ उडते. यात अनेकांची प्रकृती खालावते. अशा पद्धतीने रुग्णाला उपचारासाठी दाखल करून न घेता, दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिल्यास संबंधित डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा शैल्य चिकित्सक पवार यांनी दिला.

चुकून फास्ट ट्रेनमध्ये चढली, गडबडीत प्लॅटफॉर्मवर उडी, डोंबिवलीकर भाग्यश्रीचा दुःखद अंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here