वाचा:
पुणे शहरात मार्च महिन्यापासून करोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हजार ते दीड हजार रुग्ण आढळून येत आहेत. अनेक उपाययोजना करूनही करोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यात पालिकेला यश आलेले नाही. शहरात गुरुवारी एकूण करोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे पोहोचली. शहरातील करोनाग्रस्तांचा आकडा आता एक लाख ४५९ इतका झाला आहे. शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव कायम असून ऑगस्ट महिना सर्वांत घातक ठरल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पुणे जिल्ह्यात जुलैमध्ये ८४ हजार ७६५ रुग्ण आढळले, तर ऑगस्टमध्ये हीच संख्या ८५ हजार ५४९पर्यंत पोहोचली. ऑगस्टअखेर संपूर्ण पुणे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या एक लाख ७० हजार ३१४ झाली आहे. संपूर्ण देशात ही रुग्णसंख्या सर्वाधिक असल्याने ही साथ आटोक्यात आणण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याचे आव्हान महापालिकेसह जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.
वाचा:
जुलै महिन्यात एक हजार २१८ नागरिकांचा बळी गेला. मात्र, ऑगस्टमध्ये हा आकडा मागे पडला आणि जवळपास २ हजार १५० नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात ऑगस्टमध्ये दैनंदिन स्वरूपात सरासरी ९० जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये झालेली वाढ चिंताजनक असून ऑगस्ट महिन्यात आत्तापर्यंतचे सर्वाधिक दोन हजार १५३ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा चार हजारांच्या पुढे गेला आहे.
वाढता संसर्ग चिंतेची बाब
‘पश्चिम महाराष्ट्रात करोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. मुंबई, ठाण्याकडून या साथीचे केंद्र सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे निश्चितच जबाबदारी वाढवणारे आहे. अशा वेळी पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे करोना लढ्यात ज्या चुका यापूर्वी इतर काही जिल्ह्यांकडून झाल्या असतील, त्या तुम्ही होऊ देऊ नका,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री यांनी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना आढावा बैठकीत दिल्या.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times