म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘ते आले… त्यांनी पाहिले आणि प्रसंगी कठोर शब्दांत सुनावलेही’ असा ज्येष्ठ नेते यांच्या काळजीवाहू वृत्तीचा अनुभव पिंपरी-चिंचवडमधील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला गुरुवारी आला. कोणत्याही परिस्थितीत मृत्यूदर रोखा, अशी सक्त सूचना त्यांनी या वेळी केली.

करोनाच्या संसर्गामुळे उद्योनगरीतील चिंता वाढत आहे. त्याची दखल घेऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अचानक महापालिकेला भेट दिली. ते तब्बल अठरा वर्षांनी पालिकेच्या प्रशासकीय इमारतीत येत असल्याने राजकीय पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांची तारांबळ उडाली. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास शरद पवारांचे पालिकेत आगमन झाले.

पदाधिकारी आणि मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर वॉर रूमला भेट दिली. या ठिकाणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उपाययोजनांविषयी माहिती देण्यास सुरुवात केली. त्याविषयी शांतपणे ऐकून घेतले. त्यावर प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. ‘समजा, माझ्यासारखी वयोवृद्ध व्यक्ती करोनाबाधित झाल्यास तुम्ही त्यांच्या संपर्कात आलेल्या किती व्यक्तींचे ट्रेसिंग करता?’ त्यावर आयुक्तांनी ‘चौदा व्यक्तींचे’ असे उत्तर दिले. त्याविषयी नाराजी व्यक्त करून ‘किमान वीस लोकांचे ट्रेसिंग करा. टेस्टिंगची संख्या वाढवा,’ अशी सूचना त्यांनी या वेळी केली.

‘शहरात किती आयसीयू बेड आहेत?’ या प्रश्नावर आयुक्तांनी शंभरएक असतील, असे उत्तर दिले. या वेळी उपस्थित राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. सुनावणीच्या सुरात पवार यांनी ‘मग, रुग्णांना बेड का उपलब्ध होत नाहीत?’ असा कठोर पवित्रा घेतला. त्यावर आयुक्तही निरुत्तर झाले.

शहरातील मृत्यूदर दोनच्या जवळ पोहचला आहे. त्याविषयी चिंता व्यक्त करून पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत मृत्यूदर रोखण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, असा सल्ला दिला. जंबो रुग्णालयात डॉक्टर, रुग्णवाहिकेचे नियोजन व्यवस्थित करावे. पुण्यात पत्रकाराचा झालेला मृत्यू दुर्दैवी आहे. कोणाचाही असा मृत्यू होता कामा नये. राज्य सरकारकडून काही मदत लागली तर सांगा. आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिले.

परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक आस्थापना आहेत. त्यातील व्यवस्थापन, कामगार यांच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी. केवळ रुग्णवाहिकेअभावी एखाद्याचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना होऊ नये, याची दक्षता घेण्याची सूचना प्रशासनाला केली. बेड व्यवस्थापन, कोव्हिड केअर सेंटर, एखाद्या रुग्णाला किती वेळात दाखल करून घेऊन उपचार केले जातात याची सविस्तर माहिती त्यांनी घेतली.

या वेळी महापौर माई ढोरे, माजी आमदार विलास लांडे, आझम पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर योगेश बहल या वेळी उपस्थित होते.

पन्नास रेमडेसिवरची इंजेक्शन

करोना रुग्णांसाठी सद्यःस्थितीत वरदान ठरणारी रेमडेसिवरची पन्नास इंजेक्शने शरद पवार यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सुपुर्द केली. ‘करोनाबाधित गरीब आणि गरजू रुग्णांसाठी ही इंजेक्शने वापरावीत,’ अशी सूचना त्यांनी केली. यापूर्वीदेखील पवार यांनी पन्नास इंजेक्शने दिली होती.

पवारांच्या सूचना

– ट्रेसिंग आणि टेस्टिंगवर भर द्या.

– कोणत्याही परिस्थितीत मृत्यूदर रोखा.

– जंबो रुग्णालयातील व्यवस्थापन चोख ठेवा.

– रुग्णवाहिकांचे योग्य नियोजन करा.

– औद्योगिक आस्थापनांकडे लक्ष द्या.

– बेड मॅनेजमेंट सिस्टिम काटेकोरपणे राबवा.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here