म. टा. प्रतिनिधी, नगर : दुचाकीवर आलेल्या अज्ञात तीन चोरट्यांनी एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत त्याच्याकडील तीन लाख रूपये पळवले. काल, ३ सप्टेंबरला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी काल रात्री उशिरा पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्नील धनंजय झेंडे हे एटीएम ऑपरेटर म्हणून काम करतात. ते त्यांच्या साथीदारासह राहुरी ते टाकळीमिया रोडने एटीएमला पैशांचा भरणा करण्यासाठी दुचाकीवरून चालले होते. यावेळी या दोघांच्या दुचाकीला पाठीमागून विना क्रमांकच्या दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी कट मारला व स्वप्नील झेंडे यांच्या पाठीला असणारी पैशांची बॅग ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झेंडे व त्यांचा साथीदार दुचाकीवरून खाली पडले. विना नंबरच्या दुचाकीवर आलेले तिघे जण चोर असल्याचा संशय आल्यामुळे झेंडे यांनी त्यांच्याकडे असणारी पैशाची बॅग घेऊन तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन जणांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडील तीन लाख रुपये असणारी बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यानंतर काही क्षणातच घटनास्थळावरून या चोरट्यांनी राहुरीच्या दिशेने धूम ठोकली.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी अज्ञात तीन जणांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके करीत आहेत.

आणखी बातम्या वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here