म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद: संत साहित्यावरील परिसंवादात दुसरी बाजू मांडू देण्याची मागणी करीत तीन व्यक्तींनी व्यासपीठावर गोंधळ घातला. त्यामुळे काही वेळ प्रचंड गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतले. संमेलनाचे अध्यक्ष यांना धर्मावरून विरोध करणाऱ्या गटाचे हे लोक आहेत असा आरोप स्वागत मंडळाच्या सदस्यांनी केला.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी सायंकाळी “संत साहित्याचे सामाजिक दृष्टीने पुरेसे आकलन न झाल्यामुळे समाजात बुवाबाजीचे प्रस्थ वाढते आहे” या विषयावर ह. भ. प. राम महाराज राऊत यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. परिसंवादाला सुरुवात होण्यापूर्वीच लातूर येथील डॉ. जगन्नाथ पाटील आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी व्यासपीठावर प्रवेश केला. तसेच माइकचा ताबा घेऊन परिसंवादातील विषयाची दुसरी बाजू मांडू देण्याची मागणी केली. या मागणीला संयोजकांनी नकार देत माईक हिसकावून घेतला. त्यामुळे पाटील आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी व्यासपीठावर प्रचंड गोंधळ घातला. सभामंडप गर्दीने भरलेला असताना अचानक सुरू झालेल्या या वादामुळे एकच गोंधळ उडाला.

नियोजित परिसंवाद ठरल्याप्रमाणे होईल. ऐनवेळी कुणालाही बोलता येणार नाही असे संयोजकांनी सांगितले. पण, बोलण्यावर ठाम असलेल्या पाटील यांनी व्यासपीठ सोडण्यास नकार दिला. अखेर पोलिसांनी पाटील आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना ताब्यात घेतले. संत साहित्याचे चुकीचे आकलन परिसंवादात मांडण्यात येत आहे. संत साहित्यामुळे कोणतीही बुवाबाजी वाढली नाही, असे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. संयोजन समिती आणि काही रसिकांनी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला. आक्षेप घेणाऱ्यांना संमेलन स्थळापासून दूर नेण्यात आले.

दरम्यान, खाजगी सुरक्षारक्षक बोलावून संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दमदाटी केल्याचा आरोप पाटील यांनी केला. व्यासपीठावर मान्यवर आणि महिला प्रतिनिधी उपस्थित आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही सुरक्षा व्यवस्था आहे, असे संयोजन समितीने स्पष्ट केले. पाटील यांच्या सहकाऱ्यांच्या हातात वादग्रस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वृत्तपत्राचे अंक होते. या व्यक्ती कोणत्या संघटनेशी निगडित आहेत असे विचारले असता दिब्रिटो यांना विरोध करणाऱ्या गटाचे हे लोक आहेत असे संयोजन समितीचे पदाधिकारी अग्निवेश शिंदे यांनी सांगितले.

संमेलनाला गालबोट
डॉ. जगन्नाथ पाटील यांना साहित्य संमेलनाच्या पुस्तक दालनात ३४ क्रमांकाचे दालन देण्यात आले आहे. कोणत्याही विचारधारेला संमेलनस्थळी विरोध नसून योग्य सन्मान आहे. परिसंवाद सुरू असतानाच व्यासपीठावर येऊन विरोध करणे हा पूर्वनियोजित डाव होता. त्यातून संमेलनाला गालबोट लागले, अशी खंत संयोजकांनी व्यक्त केली.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा धर्म काढून त्यांना विरोध करणाऱ्या प्रवृत्तीचे हे लोक होते. यांच्या विरोधानंतरही संयोजन समिती लोकांच्या उत्साहावर विरजण पडू देणार नाही.
अग्निवेश शिंदे, पदाधिकारी, स्वागत मंडळ

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here