म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: हार्डवेअरच्या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (३० ऑगस्ट) पहाटे साडेपाचच्या सुमारास चिखलीतील पूर्णानगर येथे उघड झाली. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

चिमणाराम वनाजी चौधरी (वय ४८), नम्रता चिमणाराम चौधरी (वय ४४), भावेश चिमणाराम चौधरी (वय १३) आणि चिकू ऊर्फ सचिन चिमणाराम चौधरी (वय १०) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली परिसरातील पूर्णानगर येथील पूजा हाइट्स हौसिंग सोसायटीत बीआरटी मार्गाच्या सेवारस्त्याला लागून दुकाने आहेत. त्यात चिमणाराम चौधरी यांचे ‘सचिन हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल्स’ नावाचे दुकान आहे. या दुकानाच्या पोटमाळ्यावर चौधरी कुटुंब राहत होते.

हृदयद्रावक! ताई मला माफ कर, इतकं लिहून भावाने रक्षाबंधनलाच बहिणीच्याच घरात आयुष्य संपवलं
मंगळवारी (२९ ऑगस्ट) रात्री चौधरी दुकान बंद करून पोटमाळ्यावर झोपले होते. बुधवारी पहाटेच्या सुमारास दुकानात आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे दुकानात धूर झाला. गुदमरू लागल्याने चिमणाराम आणि त्यांची पत्नी आणि मुलांना जाग आली. त्यांनी दुकानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, धूर व आगीमुळे होरपळून त्यांचा मृत्यू झाला.

दुकानाच्या पोटमाळ्यावरील खिडकीतून आगीचे लोळ व धुराचे लोट बाहेर पडत असल्याने दुकानात आग लागल्याचे नागरिकांना दिसले. त्यांनी अग्निशामक दल व पोलिसांना माहिती दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाला पहाटे ५.२५ वाजता कॉल झाला. त्यानंतर काही वेळातच अग्निशामक दलाचा बंब आणि पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशामक दलाच्या जवानांनी काउंटर कापून बाजूला काढले. त्याच वेळी दुकानाच्या दुसऱ्या बाजूचे शटरही तोडले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मृतदेह बाहेर काढून पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात हलवले.

‘नुकतेच घेतले होते स्वत:चे घर’

‘चौधरी कुटुंबीय मूळचे राजस्थान राज्यातील पाली जिल्ह्यातील होते. हार्डवेअरच्या व्यवसायानिमित्त १० वर्षांपूर्वी ते पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झाले. त्यांनी परिसरातच स्वतःचे घर घेतले होते. तेथे ते स्थलांतरही करणार होते. आनंद साजरा करण्यासाठी ते नुकतेच जम्मू-काश्मिरची सहलही करून आले होते; परंतु रक्षाबंधनादिवशी झालेल्या दुर्दैवी घटनेत कुटुंबाचा अंत झाला,’ अशी माहिती माजी नगरसेवक एकनाथ पवार यांनी दिली.

साखर झोपेतच सगळं संपलं; कश्मीरवरून आले, झोपले ते उठलेच नाहीत; पिंपरीत आगीत होरपळून अख्खं कुटुंब गेलं

पूर्णानगर येथील दुकानास लागलेल्या आगीत चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. चौधरी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास चालू आहे. पोलिस, महापालिका आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महापालिका

16 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here