नाशिक: मुंबईत कायदा-सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झालेले नाशिकचे मावळते पोलीस आयुक्त आज मुंबईला रवाना झाले. नव्या आयुक्तांकडे पदभार सोपवून शहर सोडताना नागरे-पाटील भावूक झाले होते. ऑडिओ मेसेजच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र पोलीस दलातील धडाडीचे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे नागरे-पाटील मागील दीड वर्षे नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहत होते. ठाकरे सरकारने नुकत्याच केलेल्या ४० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये त्यांचाही समावेश आहे. त्यांना आता मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी मिळाली आहे. या काळात आलेले अनुभव नागरे-पाटील यांनी आपल्या ऑडिओ संदेशातून व्यक्त केले आहेत.

वाचा:

नाशिककरांना नमस्कार करून त्यांनी ऑडिओ संदेशाची सुरुवात केली आहे. ते म्हणतात, ‘नाशिककर नमस्कार, गेली दीड वर्षे आपली सेवा करण्याची मला संधी मिळाली. आज मी पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार नवे आयुक्त दीपक पांडे यांच्याकडे देऊन मुंबईला निघालोय. नाशिकसारख्या प्रगत, सुधारणावादी शहराची सेवा करण्याची संधी मिळाली. या शहराला सांस्कृतिक, सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक असा वारसा आहे. शिक्षण, शेती, उद्योग, पर्यटन अशा सगळ्या क्षेत्रात नाशिकची घोडदौड मोठ्या वेगानं सुरू आहे. इथं काम करताना इथली माणसं, इथली माती, इथलं पाणी, इथला निसर्ग याच्या प्रेमातच माणूस पडतो. या आल्हाददायक, गोड शहराला सोडून जाताना अंत:करण जड आहे. मात्र, हा ऋणानुबंध निश्चितच कायम राहील. आपण माझ्या सदैव संपर्कात राहाल. आपलं प्रेम, आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो.

वाचा:

‘कोविडसारख्या संक्रमणाचा काळ असो, निवडणूक, सण-उत्सव असो, या काळात आपण सदैव माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलात. नाशिकची जनता प्रगल्भ, कायद्याचं पालन करणारी आहे. प्रशासनाच्या चांगल्या उपक्रमात सहभाग नोंदवणारी आहे. त्यामुळंच या शहराची प्रगती वेगाने होत आहे. या शहराच्या प्रगतीसाठी, सुरक्षिततेसाठी, आरोग्यासाठी सुयश चिंतितो,’ असंही नागरे-पाटील यांनी शेवटी म्हटलं आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here