म. टा. प्रतिनिधी, : साकेगावजवळील कोविड रुग्णालय म्हणून अधिग्रहीत केलेल्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णालयातून ताब्यात घेतलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी भूसावळ कब्रस्थानात मृताच्या नातेवाईकांनी मृतदेहाची पाहणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला.

भुसावळातील मुस्लीम कॉलनीतील ६५ वर्षीय वृद्ध महिलेला तीन दिवसापूर्वी अस्वस्थपणा आणि उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना रेल्वे रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र तेथील डॉक्टरांनी या महिलेस गोदावरी रुग्णालयातील सेंटरमध्ये हलविले. त्यानंतर गुरुवारी रात्री महिलेच्या नातेवाईकांना गोदावरी रुग्णालयातून ही महिला मृत झाल्याचे दूरध्वनीद्वारे कळवण्यात आले होते. आज सकाळी फातिमाबी यांचे नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयात आले. तेव्हा रुग्णालयाने प्लास्टिकच्या बॅगमध्ये गुंडाळलेला मृतदेह ताब्यात देऊन तो सरळ कब्रस्थानात नेऊन अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना नातेवाईकांना दिल्या.

त्यानुसार, फातिमाबी यांचे नातेवाईक मृतदेह घेऊन भुसावळला गेले. त्यानंतर कब्रस्थानात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी फातिमाबी यांच्या मुलींनी अखेरचे दर्शन घेण्यासाठी बॅग उघडून पाहिली असता, त्यांना जबर धक्का बसला. तो मृतदेह फातिमाबी यांचा नव्हता. या प्रकारानंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक तसेच तहसीलदार आणि आमदार संजय सावकारे यांनी मुस्लिम कॉलनी कडे धाव घेतली.

यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी वृद्ध महिलेच्या नातेवाईकांची समजूत काढून हा मृतदेह गोदावरी रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये परत करण्यात आला. या महिलेचा मृतदेह जळगाव शहरातील दादावाडीत तर दादा वाडीतील महिलेचा मृतदेह येथे देण्यात आला होता.

आमदार सावकारे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याचे सांगत याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. सरकार आणि स्थानिक प्रशासनाने या प्रकाराची दखल घेऊन दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी केली.

फातिमाबी यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिलेला मृतदेह हिंदू महिलेचा होता. सुदैवाने वेळीच मृतदेहाची ओळख पटल्याने अनर्थ टळला. अन्यथा हिंदू महिलेवर मुस्लिम पद्धतीने आणि मुस्लिम महिलेवर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार होण्याची भीती होती, असेही सावकारे यावेळी म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here