जालना: पोळ्याच्या दिवशी झालेल्या वादातून शुक्रवारी येथील गावात सकाळी दोन तरुणांची जमावाने निर्घृण हत्या केली. राहुल बोर्डे आणि प्रदीप बोर्डे असे हत्या झालेल्या तरुणांची नावे आहेत. या घटनेने गावात वातावरण तणावाचे असून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे.

जालना शहरापासून जवळच असलेल्या पानशेंद्रा गावात पोळ्याच्या दिवशी राहुल गौतम बोर्डे आणि गावातील काही जणांसोबत वाद होऊन हाणामारी झाली होती. त्या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी राहुल बोर्डे ( वय २५) आणि त्याचा भाऊ प्रदीप बोर्डे (वय २३) या दोघा भावांना १० ते १५ जणांच्या जमावाने गाठले. त्यांच्यावर काठ्या, कुऱ्हाडी आणि लोखंडी सळ्यांनी हल्ला केला. यामध्ये राहुल बोर्डे हा जागीच ठार झाला. तर प्रदीप हा गंभीर जखमी झाला. मृत राहुल आणि जखमी तरुणाला जिल्हा रुग्णालयात तात्काळ नेण्यात आले. घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात तैनात करण्यात आला आहे. संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.

दरम्यान, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रदीप गौतम बोर्डे याचाही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित १५ जणांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती समजते. तर हल्ल्यात आणखी एक जण जखमी असून, तो जमावाच्या तावडीतून सुटला असून, तेव्हापासून तो बेपत्ता आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here