रायपूर: मैदानात खेळतवेळी फुटबॉल फुटल्यानंतर शाळा संचालकानं विद्यार्थ्यांना अमानवी शिक्षा दिली. त्यानं विद्यार्थ्यांना दोन दिवस उपाशी ठेवलं. छत्तीसगडच्या सरगुजामधील जगन्नाथपूर गावातील मिशन स्कूलमध्ये ही घटना घडली. फुटबॉल फुटल्यामुळे फादर संतापले. त्यांनी ४५ मुलांना दोन दिवस उपाशी ठेवलं. या अमानुष शिक्षेचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर प्रशासनाचं पथक शाळेत पोहोचलं. त्यांनी तपास केला असता घटना खरी असल्याचं समजलं. या प्रकरणात आता पुढील कारवाई सुरू आहे.सूरजपूर जिल्ह्यात येणाऱ्या जगन्नाथपूर मिशन स्कूलमध्ये लहान मुलांसोबत अशोभनीय प्रकार करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे कारवाईसाठी दबाव निर्माण झाला. दोन दिवसांपूर्वी मैदानात खेळत असताना मुलांकडून फुटबॉल फुटला. त्यामुळे मिशन स्कूलचे फादर विद्यार्थ्यांवर संतापले. ते मुलांना ओरडले. त्यांनी मुलांना वसतिगृहात जाऊन गुपचूप झोपण्यास सांगितलं. त्यानंतर दोन दिवस त्यांना खाण्यासाठी काहीही दिलं नाही.२८ ऑगस्टला जगन्नाथपूर मिशन स्कूलचे ४५ विद्यार्थी फुटबॉल खेळत होते. मुलं खेळत असताना फुटबॉल फुटला. तेव्हा स्कूलचे संचालक फादर पीटर सेदोम तिथे पोहोचले. फुटलेला फुटबॉल पाहून फादर नाराज झाले. ते मुलांवर ओरडले. त्यांनी मुलांना तातडीनं वसतिगृहात जाण्यास सांगितलं. फुटबॉल फुटल्यामुळे झालेल्या नुकसानाच्या बदल्यात तुम्हाला जेवण मिळणार नाही, असं फर्मान त्यांनी काढलं. फादरचा राग पाहून मुलं गुपचप वसतिगृहात गेली. २८ ऑगस्टच्या दुपारी घडलेली घटना २९ ऑगस्टला स्थानिकांना समजली. वसतिगृहात राहणाऱ्या उपाशी विद्यार्थ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. काहींनी मुलांना बिस्किटं आणि केळी देत दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मुलांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. पण घाबरलेली, भेदरलेली मुलं काहीच बोलत नव्हती. उपाशी ठेवण्यात आलेली ४५ पैकी बहुतांश मुलं ८ ते १० वर्षे वयोगटातील आहेत. या वसतिगृहात मुलांची पुरेशी काळजी घेतली जात नाही, त्यांचे हाल केले जातात अशी माहिती समोर आली आहे.