मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं ट्विट केल्यानंतर कंगनानं आणखी एक वादग्रस्त ट्विट केलं आहे. मुंबईत येतेय, कुणाच्या बापात हिंमत असेल रोखून दाखवा, असं थेट आव्हान कंगनानं दिलं होतं. कंगनानं केलेल्या या ट्विटनंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुंबईसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून तिच्यावर टीका करण्यात येत आहे. नेत्यांनीही कंगनाविरोधात आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. राज्यातील विविध भागांत कंगनाविरोधात घोषणाबाजी केली आहे. तर, मुंबईतील शिवसेना भवनासमोर महिला आघाडीनं कंगनाचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला आहे. तर, नाशिकमध्येही शिवसेना कार्यालयाबाहेर कंगनाविरोधात घोषणाबाजी केली आहे. तर, युवा शिवसेनेने कोल्हापुरात निदर्शने करून तिचा निषेध केला.
दरम्यान, मुंबईवर ट्विट केल्यानंतर भाजप नेते राम कदम यांनी कंगनाला झाशीची राणी म्हटलं होतं. यावरूनही शिवसेनेनं राम कदम यांचा समाचार घेतला आहे. ईशान्य मुंबई महिला आघाडीच्या वतीने राम कदम यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली आहेत.
दरम्यान, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ट्विटरवरून कंगना रणौटला इशारा दिला आहे. ‘कंगनाला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली आहे. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा देतानाच उद्योजक व सेलिब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांकडे मागणी करणार आहे, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांचं प्रत्युतर
मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच आहे. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्र दुश्मनांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही. हे वचन, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. राऊत यांनी ट्विटरवरून कंगनावर निशाणा साधला आहे.
तत्पूर्वी राऊत यांनी दुपारी मीडियाशी संवाद साधताना कंगनावर जोरदार हल्ला चढवला होता. माझं नाव घेऊन कुणाला पब्लिसिटी स्टंट करायचा असेल तर खुशाल करा. पण मुंबई तुम्हाला पोसते. सर्व काही देते. ज्या मुंबईने हुतात्मे दिले. त्या मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल कोणीही उठून काहीही बोलू शकत नाही. आम्ही ते खपवून घेणार नाही. आम्ही शिवसैनिक आहोत. पोकळ धमक्या देत नाही. थेट कृती करतो, असा इशारा राऊत यांनी दिला होता. मुंबईबाबत काहीही बरळणाऱ्या अशा मेंटल केसेस आरोग्य खात्याने हाताळाव्यात. मुंबई पोलिसांनी त्याबाबत कठोर पावलं उचलावीत. अशा पागल लोकांना जे पक्ष पाठिंबा देत आहेत. त्या पक्षांना पाकव्याप्त काश्मीरने मदतान केलं आहे का? तुम्हाला पाकिस्तानी लोकांनी मतदान केलं आहे का? मुंबई पोलीस हे पाकिस्तानचे पोलीस आहेत का? ज्या मुंबई पोलिसांनी अतिरेकी हल्ले परतवून लावून मुंबईचं संरक्षण केलं ते लोक काहीही बरळणार आहेत का? असा सवाल करतानाच झाशीची राणी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहे. ड्रग्सच्या गुळण्या करून आणि नशेच्या अंमलात कुणी स्वत:ला झाशीची राणी समजत असेल आणि अशा व्यक्तिला कोणी पाठिंबा देत असेल तर देशाचं राष्ट्रीयत्व किती खालच्या पातळीवर गेलं हे दिसून येतं, असंही ते म्हणाले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times