देशातील ढासळत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीविरोधात मराठी साहित्यिकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शुक्रवारी आवाज उठवला. धर्मांध वातावरण, वाढती असहिष्णुता, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच, गोहत्येच्या संशयावरून अल्पसंख्याकांचे घेतले जाणारे सामूहिक बळी, विरोधात मत मांडणाऱ्यांना देशद्रोही ठरवणे आणि जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाण या सर्व प्रकारांविरोधात साहित्यिकांनी ताशेरे ओढून देशातील परिस्थितीवर हल्ला चढवला. देशाला वेठीस धरले जात आहे अशी टीका केली. फादर दिब्रिटो यांच्यासह संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर, कवियित्री अनुराधा पाटील आदींनी देशातील सद्यपरिस्थितीवर टीका केली.
या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देशमुख म्हणाले की, भारतीय लोकशाहीची फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केलेली वैचारिक मांडणी म्हणजे आज देशातील राजकारणासमोर उभ्या असलेल्या प्रश्नांना समजावून घेण्याची सोपी वाटच आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला स्पष्ट, परखड आणि कणखर विचार व्यक्त करण्याची फार मोठी परंपरा आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन या देशाच्या भल्याची सर्वसमावेशक भूमिका मांडली आहे. महाराष्ट्राची प्रतिष्ठा उंचावणाऱ्या त्यांच्या या भाषणाने सर्वच राज्यकर्त्यांना जबाबदारीचे भान दिले आहे. त्याची दखल देशपातळीवर घेतली जाईल, अशी आशा आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांची दखल घेऊन त्याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी मी त्यांची भेट घेण्याचे ठरविले आहे. त्यांची प्रकृती सुधारल्यावर त्यांच्याच सोयीने ही भेट होईल, असे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times