ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आंतरवाली येथे शनिवारी भेट दिली. त्यापूर्वी अंबड येथे उपजिल्हा रुग्णालयात जखमी आंदोलकांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर अंकुशनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. ‘मराठवाडा हैदराबाद संस्थानात होता. विदर्भ हा ‘सीपी अँड बेरार’चा भाग होता. विदर्भ, तेलंगण, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातमध्ये कुणबी समाजाला आरक्षण आहे. ही तरतूद जुन्या काळातील आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न होता. पण, तो निर्णय न्यायालयात टिकला नाही. कोणत्याही प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य आहे. त्यासाठी राज्य व केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा,’ असे पवार म्हणाले.
‘जखमींची विचारपूस करीत असताना वेगळीच माहिती मिळाली. आंदोलन शांततेत सुरू असताना वरून कुणाचा तरी फोन आल्याचे लोक सांगत होते. वरून फोन करणारे कोण आहे ते शोधावे लागेल. ‘इंडिया’ची अधिकृत बैठक मुंबईत सुरू होती. त्यामुळे लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी लाठीमाराचा प्रकार केला की काय असाही संशय येतो,’ असे पवार म्हणाले.
फडणवीस यांच्यावर टीका
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार यांनी टीका केली. ‘मी मुख्यमंत्री असताना नागपूर येथे २८ वर्षांपूर्वी गोवारी आंदोलनात चेंगराचेंगरी होऊन काही लोकांचा मृत्यू झाला होता. त्या वेळी मी नागपूरमध्ये उपस्थित नव्हतो. पण, या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून तेव्हाचे आदिवासी कल्याणमंत्री मधुकरराव पिचड यांनी राजीनामा दिला होता. मुंबईतील एका घटनेप्रकरणी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राजीनामा दिला होता. घडलेल्या घटनेची जबाबदारी ज्यांची असते त्यांनी ती घ्यायची असते,’ असे पवार म्हणाले.