म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पार्टटाइम कमाईच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रकारचे टास्क देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात साकीनाका पोलिसांना यश आले आहे. प्रदीप राजभर, शिवम सिंग, पृथ्वीराज चौहान, संदीप यादव, विश्वास चौरसिया, निखिल सिंग या सहा ठगांना पोलिसांनी अटक केली. पृथ्वीराज हा बँक खाती पुरवायचे काम करतो.

अंधेरी येथील एका गृहिणीच्या मोबाइलवर सोफिया नावाच्या महिलेकडून एक संदेश आला. यामध्ये हा संदेश एका डिजिटल कंपनीमार्फत असून पार्टटाइम नोकरीची चांगली संधी आहे. व्हिडीओला सबस्क्राइब करून रिव्ह्यू देण्याचे टास्क दिले जाईल, असे म्हटले होते. घरबसल्या काम असल्याने गृहिणीने होकार दिला. सुरुवातीला काही टास्कचे पैसेही मिळाले. त्यानंतर पेड टास्कच्या नावाखाली गृहिणीची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. साकीनाका पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गबाजी चिमटे यांच्या पथकातील उपनिरीक्षक सुनील चव्हाण, गणेश गायकर, गणेश धनावडे, सीमा काशीद याच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण करताना आरोपींबाबत महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती लागली.

ऑनलाइन गेमच्या नावाखाली फसवणूक, बिझनेस पार्टनरनेच ५८ कोटींना घातला गंडा

पोलिसांनी संदीपला नालासोपारा येथून शोधून काढले. त्याच्या चौकशीत पृथ्वीराजचे नाव समोर आल्यानंतर त्यालाही अटक केली. दोघांच्या तपासणीत प्रदीप, शिवम, विश्वास आणि निखिलची माहिती मिळाली. पृथ्वीराज हा सूत्रधार असून त्याने इतरांना पाच ते दहा हजार रुपये देऊन ती खाती उघडली होती. त्या खात्याचा वापर ट्रेडिंगसाठी होणार असल्याचे भासवले होते. पृथ्वीराजला प्रत्येक खात्यासाठी पाच हजार रुपये कमिशन मिळायचे. तो युझर आयडी आणि पासवर्ड हे दुबईमधील ठगांना द्यायचा.

विदेशापर्यंत धागेदारे

या टोळीतील मुख्य सायबरचोर हा दुबईत असल्याचे पोलिसांच्या चौकशीतून समोर आले आहे. एका दिवसासाठी घेण्यात आलेल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होताच सायबरचोर ताबडतोब ही रक्कम क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून इतरत्र वळवतात. अटक असलेल्या पाच जणांच्या खात्यात प्रत्येकी आठ ते १० लाख रुपये जमा झाले होते.

Sudhir More: माजी आमदाराच्या मुलीकडून ब्लॅकमेलिंग, शिवसैनिक सुधीर मोरे मृत्यूप्रकरणात महत्त्वाची अपडेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here