जालना : गेल्या चार वर्षांपासून थंडावलेले मराठा आरक्षणाचे मोर्चे पुन्हा जालन्याच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेत. त्याला कारण ठरलंय जालन्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी गावातील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील आमरण उपोषण… मराठा आरक्षणाचा कायदेशीर लढा न्यायालयात सुरू असला तरी सरकारने अधिक जागृत होऊन समाजातील मुलांना न्याय द्यावा, त्यांची परिस्थिती समजून घ्यावी आणि आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशा मागणीसाठी मनोज जरांगे यांनी ऑगस्ट महिन्यात आंदोलन पुकारलं. काही दिवसांतच त्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. परंतु ठोस आश्वासन न मिळाल्याने जरांगे यांनी उपोषण सुरूच ठेवलं. मात्र शांततेत आंदोलन सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यात अनेक आंदोलक विद्यार्थी, महिला, वृद्ध गंभीर जखमी झाले. या सगळ्यामुळे ज्यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे ते मनोज जरांगे पाटील संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आलेत… त्यांची नेमकी ओळख काय? त्यांची पार्श्वभूमी काय? मराठा आरक्षणाच्या लढ्यात त्यांनी कसं योगदान दिलंय? याबद्दल घेतलेला आढावा…

मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी चळवळीच्या माध्यमातून गेल्या १० ते १५ वर्षापासून मनोज जरांगे पाटील काम करतायेत. मनोज तसे मूळचे बीडच्या मातोरीचे…पण काही वर्षांपूर्वी ते जालन्याच्या अंबडमधील अंकुशनगरात स्थायिक झाले. जरांगे पाटलांच्या घरची परिस्थिती बेताचीच. पण समाजसेवेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नाही. अगदी स्वत:च्या मालकीची जमीन विकून त्यांनी मराठा आरक्षण चळवळीला बळ दिलं. यासाठी त्यांनी कित्येक मोर्चे काढले, आमरण उपोषणे केली, रास्ता रोको केले…

लाठीहल्ल्याचा आदेश ‘वरून’, ‘शक्तीशाली लोक’ कोण, त्याचा शोध घेतो : शरद पवार
आर्थिक परिस्थिती बेताची

मराठा समाजासाठी लढवय्या कार्यकर्ता अशी मनोज जरांगे पाटलांची संपूर्ण मराठवाड्यात ओळख आहे. पूर्णवेळ मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी काम करणारे म्हणूनही मनोज यांची ख्याती आहे. पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडील असं मनोज यांचं कुटुंब आहे.

सुरूवातीला काँग्रेस पक्षात काम, नंतर शिवबा संघटनेची स्थापना

मनोज यांनी सुरूवातीला काँग्रेस पक्षात काम केलं. पण पुढे त्यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन शिवबा संघटनेची स्थापन केली. अतिशय आक्रमकपणे त्यांनी संघटनेच्या कामाला सुरूवात केली. नगर जिल्ह्यातील कोपर्डी अत्याचारातील आरोपींवरील हल्ला प्रकरणात शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आरोप झाला होता.

शिवरायांचं नाव घेऊन मोगलांसारखं राजकारण करता, आता मराठ्यांसोबत बहुजन समाज, फडणवीस आम्ही वाटच बघतोय : संभाजीराजे
आंदोलनं करणे हा मनोज यांचा स्थायीभाव

आंदोलने करणे हा मनोज यांचा स्थायीभाव… २०२१ मध्ये त्यांनी जालन्याच्या साष्ट पिंपळगावमध्ये तब्बल तीन महिने ठिय्या आंदोलन केलं. शिवाय सहा दिवस उपोषणही केलं. गोरीगंधारी येथे केलेल्या आंदोलनातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली.

मनोज जरांगे २०११ पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रीय आहेत. त्यांच्या नेतृत्वात २०१४ मध्ये औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर काढलेल्या मोर्चाने राज्याचं लक्ष वेधलं होतं. आतापर्यंत त्यांनी आरक्षणासाठी ३५ हून अधिक मोर्चे, आंदोलने केली.

दरम्यान, समाजासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी शनिवारी अगदी सकाळी संभाजीराजे जातीने उपस्थित राहिले. खुद्द छत्रपती आल्याचं पाहून जरांगे पाटलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तेव्हा राजेंनीही पुढे मागे न पाहता आपल्या रुमालाने जरांगे पाटलांचे अश्रू पुसत ‘रडायचं नाही-आता लढायचं’ असा निर्धार बोलून दाखवला. तेव्हा जरांगे यांनीही डोळे पुसत राजेंच्या हातात हात देऊन आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही, असा एल्गार केला.

शिंदे-फडणवीस इथं या, अधिकाऱ्यांना सस्पेंड करा; मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जवर संभाजीराजे छत्रपतींचा संताप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here