कंगनानं मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सध्या मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. कंगनाच्या विरोधात शिवसेना अधिकच आक्रमक झाली आहे. तिच्या फोटोला जोडे मारण्याचं आंदोलन केलं जात आहे. थोबाड फोडण्याची भाषा केली जात आहे. हा सगळा गदारोळ जाणीवपूर्वक घडवला जात असल्याचा आरोप मनसेचे संदीप देशपांडे यांनी केला आहे.
वाचा:
‘करोनामुळं राज्यात सध्या भयंकर परिस्थिती आहे. लाखो लोक बेरोजगार आहेत. आरोग्य व्यवस्था कोलमडल्याने हजारो लोकांचे बळी जाताहेत. मंदिरात प्रवेशाला बंदी आहे. मुख्यमंत्री घरातच बसून काम करत असल्यामुळे जनतेत नाराजी आहे. रेल्वे सेवा सुरू नसल्याने लोकांच्या प्रवासाचे हाल होताहेत. या सगळ्या परिस्थितीवरून लक्ष हटविण्यासाठी म्हणून ज्या व्यक्तीच्या वक्तव्याला पाच पैशांची किंमत नाही, तिला किंमत दिली जातेय,’ असं देशपांडे यांनी म्हटलंय.
‘ ही प्रसिद्धीसाठी वक्तव्य करणारी व्यक्ती आहे. प्रसिद्धीसाठी तिनं फेकलेल्या जाळ्यात अडकण्याइतकी शिवसेना निर्बुद्ध नक्कीच नाही. पण मुद्दाम शिवसेना जाळ्यात अडकतेय का? लोकांना होणाऱ्या त्रासापासून सर्वांचं लक्ष हटावं, यासाठी हे सर्व सुरू असल्याचं देशपांडे यांनी म्हटलंय. ‘मागील दोन महिने एका इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्राचे संपादक शिवसेनेचे वाभाडे काढत होते, तेव्हा संपूर्ण शिवसेना गप्प होती. मग आत्ताच या सगळ्याचा उद्रेक का होतोय? या षडयंत्रामागे कोण आहे याचाही विचार झाला पाहिजे. महाराष्ट्राची जनता सूज्ञ आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times