पालघर: नालासोपाऱ्यात २७ वर्षीय बॉडीबिल्डरचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. अजिंक्य कदम असं मृत पावलेल्या बॉडीबिल्डर तरुणाचं नाव आहे. पूर्वेतील मोरेगावमधील आरंभ कॉलनीमध्ये तो वास्तव्यास होता. सोमवारी सकाळी त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्याला जवळच्या पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.अजिंक्यनं ७५ किलो वजनी गटात पालघर जिल्ह्यातील विविध स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसं जिंकली होती. त्याच्या मागे आई, वडील, तीन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. अजिंक्य भावंडांमध्ये सर्वात मोठा होता. त्याच्या अकाली निधनानं कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अजिंक्यच्या मृत्यूनुळे मित्र परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.अजिंक्यला काल अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्याच्या छातीत दुखत होतं. त्यानंतर कुटुंबियांनी त्याला महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र काही तासांतच त्याला आला. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घरातला मोठा मुलगा अकाली गेल्यानं आई, वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.