अकोला : नाकाला चिमटा लावून मुलगी झोपल्याचा बनाव एका आईनं केला. पण, वैद्यकीय अहवालात या साडेपाच वर्षीय मुलीच्या हत्येचा उलगडा झाला आहे. या प्रकरणात अकोल्यातील खदान पोलिसांनी मुलीच्या आईला ताब्यात घेतले आहे. अकोला शहरातील बलोदे लेआऊट येथे ही घटना आहे. किशोरी रवी आमले (वय ५) असं मृत मुलीचं नाव असून विजया आमले असं मारेकरी आईचं नाव आहे. या संदर्भात वडील रवी आमले यांनी दिलेल्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुपारच्या वेळी घरात कोणी नसतानाच आईनं तिचा काटा काढला असल्याचं समोर आलं आहे. आईने पोटच्या मुलीला का संपवलं, या मागील गूढ अजूनही कायम आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोरी हिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, लग्नापासून पती-पत्नीमध्ये वाद होते. पत्नीने पतीला घटस्फोटाची मागणी देखील अनेकदा केली आहे.

Private Bus: गणेशोत्सवापूर्वी खासगी ट्रॅव्हल्सबाबत मोठी बातमी: तिकीट दरावर आता परिवहन विभागाचा अंकुश

काय आहे संपूर्ण घटना?

नाकाला चिमटा लावल्याने चिमुकल्या किशोरीचे प्राण गेल्याचा बनाव रचण्यात आला होता. किशोरी नाकाला चिमटा लावून झोपली आणि तिचा मृत्यू झाला असा बनाव किशोरीच्या आईने केला होता. मात्र किशोरीच्या वडिलांनी आईवरच संशय व्यक्त केला होता. त्यांनी पोलिसांना त्याबाबत माहिती दिली होती. पोलिसांनी या प्रकरणात किशोरीची वैद्यकीय तपासणी केली अन् अहवालात धक्कादायक माहिती समोर आली. यात नाकाला चिमटा लावून किशोरीचा मृत्यू झाल्याचा केलेला देखावा समोर आला. तर तिच्या अंगावर आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. जून महिन्याच्या सुरुवातीला किशोरीच्या अकस्मात मृत्यूची नोंद खदान पोलिसांनी घेतली होती. आता किशोरीची आई विजया आमले हिच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक धनंजय सायरे, पीएसआय निता दामधर, पोलीस कर्मचारी करंदीकर व आकाश राठोड काम पाहत आहेत.

काय घडलं होतं २ जून रोजी?

२ जून २०२३ रोजी सकाळी ८ वाजता कामावरुन वडील रवी हे घरी जेवणाकरीता आले. किशोरी ही घरी ट्युशनवरून आलेली होती. त्यानंतर किशोरीने सोबत जेवण केले आणि काही वेळ रूममध्ये खेळली . पुन्हा थोड्या वेळाने वडील कामाकरिता घरून दुपारी निघाले. या दरम्यान, पत्नी विजया हिचा फोन आला आणि तिने त्यांना सांगितले की, मी घरातील कामे करीत असताना किशोरी ही पलंगावर खेळता-खेळता झोपली होती, कामे संपल्यावर जेवणासाठी किशोरी हिला झोपेतून उठविले, परंतु किशोरी ही झोपेतून उठत नाही. तुम्ही लवकर घरी या असे म्हणाली. लगेच मित्र वैभव हांडे याला फोन केला अन् रवी आमले घरी गेले. किशोरी हिला शासकीय रुग्णालयात नेले असता येथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या संदर्भात रवी आमले यांनी विजया हिच्याकडे विचारपूस केली असता तिने सांगितले की, किशोरी ही पलंगावर ओले कपडे घराबाहेर वाळच घालण्याकरीता असलेल्या चिमट्यानं खेळत होती. कामे झाल्यानंतर घरात पाहिले असता किशोरीने नाकाला चिमटा लावलेला होता आणि किशोरी ही काहीच हालचाल करीत नव्हती, असे तिने सांगितले.

दरम्यान. घटना घडली तेव्हा किशोरीची आई ही एकटीच घरी होती. त्यामुळे संशयाची सुई तिच्यावरच गेली. आता वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी किशोरीच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here