कोळशाचा वाढत वापर पर्यावरणासाठी घातक ठरत आहे. कोळशामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत असून यामुळे ग्लोबल वार्मिंगचा धोका वाढला आहे. अदानींच्या ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथील प्रास्तावित कोळसा खाणींबाबत ग्रेटाने चिंता व्यक्त केली आहे. हीने ‘सिमेन्स’ला हा प्रकल्प रोखण्याचा अधिकार आहे. त्यांनी यावर फेरविचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहन सिमेन्स व्यवस्थापनाला केले आहे. हा प्रकल्प सिमेन्सने पुढे ढकलावा किंवा थांबवावा, असे ग्रेटा थनबर्गने म्हटलं आहे.
या प्रकल्पात अदानी समूहासोबत जर्मनीची सिमेन्स कंपनी भागीदार आहे. सिमेन्स अदानी समूहासाठी कोळसा खाण विकसित करणार आहे. या खाणींमधून दरवर्षी ८ ते १० दशलक्ष टन कोळसा उत्पादन घेतले जाण्याची शक्यता आहे. हा कोळसा अदानी समूहाकडून भारत आणि इतर देशांमध्ये निर्यात केला जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून ऑस्ट्रेलियातील जंगलांना आग लागली असून यात लाखो पशुपक्षी मृत्युमुखी पडले आहेत. ऑस्ट्रेलियातील पर्यावरणाबाबत जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण आहे.
शिक्षण अर्धवट सोडून पर्यावरण जागर करणारी ग्रेटा थनबर्ग गेल्या वर्षभरात सर्वाधिक चर्चेतील व्यक्तिमत्व बनली होती. गेल्या वर्षी दावोस जागतिक अर्थ परिषदेत थनबर्ग पहिल्यांदा प्रकाश झोतात आली. त्यानंतर, ती न्यूयॉर्क जागतिक हवामान परिषदेत सहभागी झाली. तिथं ग्रेटानं जगभरातील प्रमुख नेत्यांना वाढत्या कार्बन उत्सर्जनाबद्दल फैलावर घेतलं होतं.‘आमच्या अंगावर केवळ पोकळ शब्द फेकून आमचं भवितव्य कुस्करण्याची तुमची हिंमत तरी कशी होते…’असा खडा सवाल हवामान बदल परिषदेत करणारी अवघ्या सोळा वर्षीय ग्रेटा थनबर्ग टाइम मॅगझीनच्या ‘पर्सन ऑफ द इयर’ ल पुरस्काराची मानकरी ठरली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times