पाथरशेंबे येथील प्राची मोरे ही आईसोबत शेतात कामासाठी गेली होती. पाण्याची बाटली झाडावर ठेवण्यासाठी गेली असता खोडात लपून बसलेल्या नागाने तिच्या उजव्या करंगळीला दंश केला. तिला तातडीने हाताला आवळपट्टी बांधून चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी नाशिक येथे संदर्भित केले. मात्र, रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.
पोटचा गोळा डोळ्यांदेखत आपल्याला सोडून गेल्याचे दुःख व्यक्त करीत पंचक्रिया विधीच्या दिवशी आमची मुलगी गेली मात्र दुसऱ्या कोणाच्या कुटुंबातील व्यक्तीवर अशी वेळ येऊ नये म्हणून कुटुंबीयांनी निफाड येथील वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्थेशी संपर्क साधून ‘शून्य सर्पदंश जनजागृती अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला.
यात प्रमुख चार विषारी सापांची माहिती व सर्पदंशावर प्रथमोपचार कसे करावेत, याची शास्त्रीय माहिती देण्यात आली. कुत्रा, मांजर, वटवाघूळ या प्राण्यांपासून होणाऱ्या जीवघेण्या रेबीज आजाराची लक्षणे कोणते व त्यासाठी काय काळजी घ्यावी, खबरदारीचे उपाय याबाबत प्रबोधन करून जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
मनमाड उपविभागाचे प्रभारी वन संरक्षक अक्षय म्हेत्रे, चांदवड वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. वाघमारे, वनपरिमंडळ अधिकारी देवीदास चौधरी, प्रकाश सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व संयुक्त विद्यमाने वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे निफाड तालुका अध्यक्ष सर्पअभ्यासक सुशांत रणशूर, कार्याध्यक्ष मयूर बर्वे, संघटक प्रमोद महानुभाव, सदस्य श्रीकांत फड यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन मार्गदर्शन केले.