बीजिंग: जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या चीनच्या भिंतीला दोन जणांनी भगदाड पाडलं. चीनच्या शांक्सी प्रांतात दोन बांधकाम कर्मचाऱ्यांनी शॉर्टकर्ट तयार करण्यासाठी चीनच्या भिंतीचं मोठं नुकसान केलं. खोदकाम करण्यासाठी वापरली जाणारी मशीन वापरुन त्यांनी ऐतिहासिक ठेवा असलेल्या वास्तूला भगदाड पाडलं. भिंतीचं झालेलं नुकसान खूप मोठं असून त्याची भरपाई केली जाऊ शकत नाही, असं पोलीस म्हणाले.ऐतिहासिक भिंतीला नुकसान पोहोचण्यामागे दोन व्यक्ती असल्याचा संशय पोलिसांना आहे. ३८ वर्षांचा पुरुष आणि ५५ वर्षांची महिला नेहमी भिंतीजवळच काम करायचे. त्यांनीच भिंतीचं नुकसान केलं असावं असा संशय पोलिसांनी बोलून दाखवला. दोघे संशयित बांधकाम कर्मचारी असून ते भिंतीजवळच काम करायचे. भिंतीमुळे त्यांना कामावर जाण्यास अडथळा यायचा, बराच वेळ लागायचा. त्यामुळे त्यांनी भिंतीचा काही भाग पाडून शॉर्टकट रस्ता तयार केला. दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून तपास सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी मिळून ऐतिहासिक भिंतीला मोठं भगदाड पडलं. हे भगदाड इतकं मोठं आहे की त्यातून खोदकामाची मशीन आरपार जाऊ शकेल. दोघांनी मिळून चीनच्या ऐतिहासिक वारशाचं प्रचंड नुकसान केलं आहे. या नुकसानाची भरपाई केली जाऊ शकत नाही. चिनी अधिकाऱ्यांनी २४ ऑगस्टला याबद्दलची माहिती मिळाली. यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास सुरू केला.१९८७ मध्ये युनेस्कोनं चीनच्या भिंतीला जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला. चीनच्या भिंतीचा समावेश जगातील सात आश्चर्यांमध्ये होतो. या भिंतीमध्ये काही अंतरावर वॉचटॉवर्स आहेत. संरक्षणाच्या दृष्टीकोनातून या भिंतीची उभारणी करण्यात आली होती. मात्र गेल्या वर्षांपासून या भिंतीचे काही भाग कोसळले आहेत. काही भाग तर पूर्णपणे गायब झाले आहेत. चीनच्या भिंतीचा जो भाग सध्या अस्तित्वात आहे, त्यातील बहुतांश काम मिंग राजवंशच्या कार्यकाळात झालं. त्यामुळेच या भिंतीला मिंग ग्रेट वॉल असंही म्हटलं जातं.