राज्य सरकारने येत्या चार दिवसांमध्ये ठोस निर्णय न घेतल्यास मी पाण्याचाही त्याग करेन, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता. काल संध्याकाळपासून मनोज जरांगे यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे बुधवारी सकाळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. यावेळी मनोज जरांगे यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याचे निदर्शनास आले. गेल्या आठ दिवसांमध्ये उपोषणाला बसले असूनही मनोज जरांगे हे अंतरवाली सराटी गावात येणाऱ्या विविध राजकीय नेत्यांशी सातत्याने संवाद साधत आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांना आराम मिळालेला नाही. सतत या सगळ्यांशी बोलून आणि अपुऱ्या झोपेमुळे मनोज जरांगे यांना अशक्तपणा आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तुरळत अपवाद वगळता मनोज जरांगे हे झोपूनच आहेत. त्यांच्या घशालाही संसर्ग झाला आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांना त्रास होत आहे. जरांगे यांच्या रक्तातील शुगर, रक्तदाब आणि हृदयाचे ठोके नियमित आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, परिस्थिती अशीच राहिल्यास मनोज जरांगे यांची प्रकृती आणखी खालावण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बुधवारी सकाळी जालन्याचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. तसेच त्यांनी येथील सुरक्षेचाही आढावा घेतला. गेल्या आठवड्यात उपोषणस्थळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमारामुळे मराठा आंदोलक संतप्त झाले होते. यानंतर जालन्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. तर अन्य अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शैलेश बलकवडे यांनी घेतलेली जरांगेंची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.