अग्रवाल समाजाच्या संघटनेतर्फे चालवल्या जाणाऱ्या अग्रसेन छत्रवास या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात आयोजित कार्यक्रमात बुधवारी डॉ. भागवत बोलत होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सरसंघचालकांकडून श्रोत्यांमधून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरेही देण्यात आली. अलीकडच्या काळात सरसंघचालक ‘संवादी’ झाले असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
आरक्षणावर बोलताना डॉ. भागवत म्हणाले, आपल्या देशात दिलेल्या आरक्षणाला सामाजिक विषमतेचा इतिहास आहे. आपण आपल्याच समाजातील बांधवांना समाजव्यवस्थेत मागे ठेवले आणि त्यांचे जीवन पशूंसारखे झाले. त्यांची काळजी घेतली नाही. परिस्थिती बिकट झाली तरी चिंता केली नाही. कुटुंबात आजारी व्यक्तीची आपण विशेष काळजी घेतो. तसेच मागे राहिलेल्या बांधवांना बरोबरीने आणण्याच्या दिशेने उपाय करण्याची गरज आहे. त्यामुळेच आरक्षण लागू केले गेले. भेदभाव संपत नाही, तोपर्यंत संविधानुसार आहे तेवढे आरक्षण सुरूच राहावे. संघाचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
रा. स्व. संघाकडून सन २००२पर्यंत तिरंगा फडकावण्यात येत नसल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. भागवत म्हणाले, संघाने नेहमीच तिरंग्याचा सन्मान केला आहे. १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला तिरंगा फडकावला आहे. संघाचे स्वयंसेवक तिरंग्याच्या सन्मानासाठी नेहमीच आपले प्राण देण्यास तयार असतात, असे ते म्हणाले. सन १९३३मध्ये जवाहरलाल नेहरू हे जळगाव शहराजवळील फैजपूर येथे ८० फूट खांबावर तिरंगा फडकवत असताना मधेच तो अडकला. संघ स्वयंसेवक किसनसिंग राजपूत यांनी आपला जीव धोक्यात घालत ४० फूट चढत ध्वज फडकावला, अशी आठवण सरसंघचालकांनी यावेळी सांगितली.
‘अखंड भारताचे स्वप्न पूर्ण होईल’
‘अखंड भारत’ कधी होईल, असा प्रश्न एका विद्यार्थ्याने यावेळी सरसंघचालकांना केला. यावर डॉ. भागवत म्हणाले, अखंड भारत म्हणजे सीमा बदलणे नव्हे, तर भारतीय मानसिकता स्वीकारणे होय. देशाची फाळणी झाली, कारण त्यांची विचारसरणी आमच्यापेक्षा वेगळी होती. भारताचे सध्याचे चित्र पाहून शेजारील अनेकांना आता तसे वाटत आहे. त्यांनी एकदा का आमची विचारसरणी स्वीकारली, की ज्यात कट्टरतेचा समावेश नसेल, त्यावेळी अखंड भारताची निर्मिती होईल. आताची पिढी वृद्ध होण्याआधीच हे स्वप्न पूर्ण होईल, असे सरसंघचालक म्हणाले.