म. टा. प्रतिनिधी, पुणे:‘राज्य मार्ग परिवहन महामंडळा’च्या (एसटी) पुणे विभागात चालक, वाहक पदाच्या भरती प्रक्रियेला पाच वर्षांनंतर मुहूर्त लागला आहे. मात्र, एसटीच्या पुणे विभागाने परीक्षा दिलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी वगळून थेट निवड यादी लावली आहे. त्यामुळे प्रक्रियेत काळेबेरे झाल्याचा संशय उमेदवारांनी व्यक्त केला आहे. पुणे विभागाने गुणवत्ता यादी लावावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आंदोलनाला केराची टोपली

‘एसटी’ने चालक भरतीसाठी २०१९ मध्ये लेखी परीक्षा आणि बस चालविण्याची चाचणी घेतली होती. त्यानंतर करोना आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे परीक्षा दिलेल्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी मुंबईत आझाद मैदानात दोन वेळा आंदोलन करून गुणवत्ता आणि निवड यादी लवकरात लवकर जाहीर करून भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी केली होती. अखेर एसटी महामंडळाने चालक आणि वाहक भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली.

‘निवडप्रक्रिया संशयास्पद’

पुणे विभागात १६४४ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, पुणे विभागाने गुणवत्ता यादी प्रसिद्ध न करता थेट निवड आणि प्रतीक्षा यादी लावली. यादीमध्ये ११२० जणांचाच समावेश करण्यात आला. निवड न झालेल्या अनेक उमेदवारांना नेमके किती गुण पडले, याची माहितीच नाही. त्यामुळे त्यांनी पुणे विभागाकडे सर्व उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्याची मागणी केली. तरीही एसटीने गुणवत्ता यादी न लावता प्रत्येक उमेदवाराला बोलवून त्यांना पडलेले गुण दाखवण्याचे ‘उद्योग’ सुरू केले आहेत. ‘त्यामुळे या निवड प्रक्रियेत संशयास जागा असल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात येत आहे.

मराठा आंदोलनाचा एसटी विभागाला फटका, तीन दिवसांत कोटयवधीचं नुकसान

एसटीच्या पुणे विभागात चालक पदासाठी परीक्षा दिली होती. निवड प्रक्रिया राबवावी म्हणून आंदोलन केल्यानंतर पाच वर्षांनी प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, पुणे विभागाने गुणवत्ता यादी न लावता फक्त निवड झालेल्यांची यादी लावली. आमच्यापेक्षा कमी गुण असलेल्यांची निवड झाल्याचा संशय आहे. त्यामुळे सर्व गुणवत्ता यादी लावाली.

– गणेश मोडे, उमेदवार

एसटीच्या पुणे विभागाने परीक्षेनंतर गुणवत्ता यादी जाहीर केलेली नाही. आम्ही मागणी केल्यानंतर गुण तोंडी सांगितले. एसटीच्या अन्य विभागांनी अगोदर गुणवत्ता यादी जाहीर केली, त्यानंतर मेरिटनुसार निवड यादी जाहीर केली. या भरतीत काळाबाजार झाल्याची शक्यता आहे. गुणवत्ता यादी जाहीर न झाल्यास मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देणार आहोत.

– प्रसाद पाटील, उमेदवार

एसटीची वाहक भरती खासगी संस्थेमार्फत घेण्यात आली होती. त्यानंतर संस्थेने एसटीला अलविदा केले. पूर्वी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली होती. एसटी महामंडळाकडील माहितीच्या आधारे निवड यादी जाहीर केली आहे.

– अजित गायकवाड, महाव्यवस्थापक, (कामगार) एसटी महामंडळ

मराठा आंदोलनाचा फटका; तीन दिवसात STचे १५ कोटींचे नुकसान, पुण्यातून जाणाऱ्या अनेक फेऱ्या रद्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here