शहरात करोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. दररोज १२०० पेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे नागरिकांना अनेक सवलती देण्यात आले आहेत. दुकाने, मॉल सुरू झाले आहेत. तसेच, प्रवास करण्याची बंदी हटविण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांनी सुरक्षित अंतर व मास्क घालणे या नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. तरीही अनेक ठिकाणी नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. तसेच, अनेकजण मास्क न घालता बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून मास्क न घालणाऱ्यांवर कारवाईला पुन्हा जोरदार सुरवात केली आहे. गेल्या तीन दिवसात पोलिसांनी तब्बल पाच हजार २०४ जणांस मास्क न घातल्याची कारवाई केली आहे. त्यांच्याकडून २५ लाखांपेक्षा जास्त दंड वसुल करण्यात आला आहे. या पुढे देखील ही कारवाई सुरू राहणार आहे.
कोल्हापुरातही पाच हजार रुपये दंड
कोल्हापूर जिल्ह्यात करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी मास्क न घालणाऱ्या आणि सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या व्यक्तीस पाच हजार रुपये दंड करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. यासाठी जिल्हाभर खास पथके नियुक्त करण्यात आली आहेत. दरम्यान, कागल आणि गडहिंग्लज या दोन तालुक्यात दहा दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात करोनाचा कहर झाला. सप्टेंबरमध्ये हा कहर सुरूच आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात २८ हजार बाधित रुग्ण आढळले आहेत. आठशे पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रोज आठशे ते हजार रुग्ण आढळू लागल्यामुळे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे.
हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांनी अतिशय कडक भूमिका घेतली आहे. सोमवारपासून मास्क न घातलेले आढळल्यास अथवा सोशल डिस्टंसिंगचा वापर केला नसल्यास संबंधित व्यक्तींना पाच हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत खास पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात चार पोलिसांचा समावेश आहे.
रविवारी दिवसभर दंड आकारण्याबाबतीत जनजागृती करण्यात येणार असून सोमवारपासून दंडाची थेट आकारणी करण्यात येणार आहे. संबंधित व्यक्तींचा फोटोही काढण्यात येणार असून दंड न दिल्यास फौजदारी करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. जिल्ह्यात कागल आणि गडहिंग्लज या दोन तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कागलमध्ये उद्यापासून तर गडहिंग्लजमध्ये सोमवारपासून दहा दिवस हा कर्फ्यू असेल. यामध्ये नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नगरपालिका व महानगरपालिका यांनीही सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times