मुंबई: देशाची कोसळलेली अर्थव्यवस्था म्हणजे अशी एक पुडी केंद्रीय अर्थमंत्री यांनी सोडली. सरकारचे अपयश झाकण्यासाठी देवांना आरोपी करायचे हे कसले हिंदुत्व? देव गुन्हेगार ठरवले जात असतील तर देवांवर कोणत्या न्यायालयात खटला चालवायचा?, असं सांगतानाच देशाच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत की जादूटोणावाले?, असा सवाल नेते खासदार यांनी केला आहे.

देशाच्या बिघडलेल्या अर्थव्यवस्थेवर बोलणे हे आता पाप ठरत आहे. आपले पंतप्रधान मोदी सर्वच विषयांवर त्यांचे मन मोकळे करीत असतात, पण कोसळलेली अर्थव्यवस्था व त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांना ते स्पर्श करायला तयार नाहीत. नोटाबंदी ते लॉक डाऊन या मार्गावर आपली अर्थव्यवस्था साफ मरून पडली आहे. पण या पानिपताचे खापर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरळ देवावर फोडले. करोना देवानेच आणला. त्यामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. करोना ही देवाचीच करणी. त्याला सरकार काय करणार? सरकार टोकाचे देवभोळे आणि धर्माधिष्ठत असल्याचा हा परिणाम, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’ या सदरातून त्यांनी ही टीका केली आहे.

राऊत काय म्हणाले…
>> स्वतःच्या अपयशाचे खापर देवावर फोडणे हाच हिंदुत्वाचा अपमान आहे. करोना देवाची करणी असे केंद्र सरकारनेच जाहीर केल्यामुळे सरकारची जबाबदारी संपली हे पाहिले व देवदूत डॉक्टरांचाही निकाल लावला. आता देवच करोनाग्रस्तांना बरे करेल. मग ती लस तरी का शोधायची? हा प्रश्नसुद्धा आहेच. हिंदुस्थानच्या अर्थमंत्र्यांनी केलेले विधान आर्थिक महासत्तेचा ढोल वाजवणाऱ्या देशाला शोभणारे नाही.

>> देशाच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत की जादूटोणावाले? चीन लडाख परिसरात घुसला आहे व मागे हटायला तयार नाही हीसुद्धा आता देवाचीच करणी म्हणायला हवी. जसा राजा तशी प्रजा हे नेहमीच म्हटले जाते. प्रजेला तिच्या लायकीप्रमाणे राजा मिळतो हेसुद्धा सत्यच आहे. करोना म्हणजे ‘ऍक्ट ऑफ गॉड’ म्हणजे देवाची करणी असे सरकारी पातळीवर जाहीर होताच प्रजा तरी कशी मागे राहील?

>> महाराष्ट्रातील ‘बार्शी’ येथे करोना रोखण्यासाठी करोना देवीचीच स्थापना करण्यात आली. करोना देवीला प्रसन्न करण्यासाठी कोंबडी-बोकडाचा नैवेद्य दिला जातोय. देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी लोकांनी बार्शीच्या बाजारपेठेत गर्दी केली तेव्हा प्रशासन जागे झाले. कोरोना देवीची स्थापना करणाऱ्या ताराबाई पवारांवर बार्शीच्या तहसीलदारांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा दाखल केला. हा बडगा जनतेवर उगारला. पण करोना म्हणजे देवाचा प्रकोप असे जाहीरपणे सांगणाऱ्या निर्मला सीतारामन यांच्यावरही त्याच कायद्याने गुन्हा दाखल का झाला नाही?

>> ‘करोना’ काळात लोकांच्या नोकऱ्या गेल्या. पगार थकले. व्यवसाय-उद्योग बंद पडले. लोकांनी आपली घरे, संसार कसे चालवायचे? याची तजवीज देवांनी नाही तर सरकारमध्ये बसलेल्या माणसांनी करायची असते.

>> करोना येण्याआधीच देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. त्याचे खापर कोणावर फोडणार? हिंदुस्थानात या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ‘जीडीपी’चा आकडा २३.९ टक्के एवढा कोसळला. ही पडझड मानवी चुकांची व बेफिकीर वृत्तीची करणी आहे. अर्थव्यवस्थेचे मातेरे केले. त्याचे खापर देवावर फोडणे हा मानसिक गोंधळ आहे. कायद्याच्या भाषेत ‘ऍक्ट ऑफ गॉड’ म्हणजे दैवीकोप म्हणजे नक्की काय ते समजून घेतले पाहिजे.

>> माणूस ज्याच्यावर नियंत्रण मिळवू शकत नाही, निसर्गाचे संकट व नुकसान टाळू शकत नाही असे प्रकार ‘ऍक्ट ऑफ गॉड’मध्ये मोडतात. भूकंप, वादळे, समुद्र तुफान हे त्यात मोडत असते. पण रोग हा दैवी प्रकोपात मोडतो हे एकविसाव्या शतकात कोणी बोलत असेल तर आपण अजून जंगल युगात वावरत आहोत.

>> करोना महामारी व कोसळलेली अर्थव्यवस्था ही देवाची इच्छा आहे. मग सरकारची, सैन्याची गरज काय? देवच सर्वकाही पाहून घेईल.

>> पण हा सर्व दैवी प्रकोप आहे. त्यामुळे सरकारवर ठपका ठेवून काय उपयोग? पण देवांना दोष द्यायचा तर देवसुद्धा बंदिवान आहेत. मुख्य म्हणजे माणसांच्या संरक्षणात ते आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर देवांनी करणी केली असे का बोलता? विजय मल्ल्या, नीरव मोदी, हर्षद मेहता, बँकांची कर्जे बुडवणाऱ्या भांडवलदारांनी देश बुडवला. जे गेल्या ७० वर्षांत झाले ते मागच्या सहा वर्षांतही बदलले नाही. देशातील बहुसंख्य जनतेची गरिबी वाढली आणि मोजून पाच-दहा लोकांचीच श्रीमंती वाढली. बंदिवान देवांचीच ही करणी काय हो निर्मलाबाई?

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here