म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘बदलता काळ आणि शहरांतील बदलती परिस्थिती लक्षात घेऊन सण, उत्सव, परंपरांमध्येही बदल व्हायला हवा. रस्ते व चौक अडवून किंवा ते बंद करून दहीहंडी उत्सवांचे आयोजन करत वाहतूक कोंडीबरोबरच जनतेची प्रचंड गैरसोय करणे किती दिवस चालणार? त्यामुळे उत्सव साजरे होणे आवश्यक असले तरी ते नागरिकांची गैरसोय करून व्हावेत का, याबद्दल राज्य सरकारने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या धोरणाबाबत फेरविचार करून पुढील वर्षी सुधारित धोरणाद्वारे योग्य ते उपाय आखा’, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला केली.

तसेच मोकळ्या मैदानांतच आयोजन, वेगवेगळ्या पथकांना वेगवेगळ्या वेळा, अशाप्रकारच्या उपायांद्वारे असे उत्सव प्रभावीपणे साजरे होण्यासाठी सरकार पावले उचलेल, अशी अपेक्षाही न्यायालयाने आदेशात व्यक्त केली.

कल्याण पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दहीहंडी आयोजनावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये निर्माण झालेल्या वादाबाबत तोडगा काढणारा आदेश देण्याच्या निमित्ताने न्या. सुनील शुक्रे व न्या. फिरदोश पूनीवाला यांच्या खंडपीठाने सरकारला काही महत्त्वाच्या सूचना केल्या. ‘मुंबईसारख्या शहरात सातत्याने बाहेरून स्थलांतर होत आहे. मात्र, त्याचवेळी रस्ते व अन्य पायाभूत सुविधा तेवढ्याच आहेत. अशा परिस्थितीत दहीहंडीसारख्या उत्सवांत रस्ते व चौकांमध्ये आयोजने करून प्रचंड गर्दी जमवणे, वाहतूक कोंडी करणे यामुळे मोठ्या प्रमाणात जनतेची किती गैरसोय होत असेल आणि स्थानिक रहिवाशांनाही किती त्रास होत असेल, याचा गांभीर्याने विचार करायला हवा.

काँग्रेसची महागाई, बेरोजगारीची हंडी; वर्षा गायकवाडांनी भ्रष्टाचाराची हंडी फोडली

सध्या ज्याप्रकारे रस्ते व चौकांमध्ये दहीहंडीच्या आयोजनांना परवानगी दिली जात आहे, त्यात बदल होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सार्वजनिक मैदाने व मोकळ्या जागांमध्ये आयोजनांना परवानगी देणे, आयोजनांत सहभागी होणाऱ्यांच्या संख्येवर मर्यादा आणणे, वेगवेगळ्या गोविंदा पथकांना वेगवेगळ्या वेळा नेमून देणे, अशाप्रकारच्या उपायांचा विचार करून सरकारी प्रशासनांना योग्य ते धोरण आखता येईल. त्याचबरोबर सुधारित धोरण आखताना सार्वजनिक रस्ते व चौकांमधील आयोजनाच्या वेळी रस्ते व सार्वजनिक भागांचे जे काही नुकसान झाले असेल तर ते भरून ती जागा पूर्ववत करण्याचे बंधन आयोजकांना घालण्याचाही विचार सरकारने करावा’, असे खंडपीठाने आपल्या आदेशात स्पष्ट केले.

शिवाजी चौकात शिवसेनेचा उत्सव

‘सन २००८पासून आम्हीच शिवाजी चौकात दहीहंडीचे आयोजन करत असताना यावर्षी महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी शिंदे गटाच्या नेत्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले आणि आम्हाला नाकारले’, असे गाऱ्हाणे मांडत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कल्याण पश्चिम शहर प्रमुख सचिन बासरे यांनी अॅड. सिद्धी भोसले यांच्यामार्फत याचिकेद्वारे मांडले होते. पोलिसांतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी बाजू मांडली. ‘आता फार वेळ उपलब्ध नाही आणि पोलिसांना आदेश बदलणे कठीण आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी एका गटाला तडजोड व त्याग करावा लागेल. तो तुम्ही करा. पुढील वर्षी योग्य धोरण आखण्यास आम्ही सांगत आहोत’, असे खंडपीठाने सुचवले. त्यामुळे कुबा रेस्टॉरंट व गुरुदेव हॉटेल यामधील जागेत आयोजन करण्याची तयारी बासरे यांनी दर्शवली. त्यानुसार त्यांना तत्काळ परवानगी देण्याचा आदेश खंडपीठाने पोलिस व कल्याण-डोंबिवली महापालिकेला दिला.

Pune Crime: १० लाखांची लाच घेणं पडलं महागात, पुण्यात कॉलेजमधील डीनवर मोठी कारवाई; नेमकं काय घडलं?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here