कोल्हापूर: करोनाचा अहवाल निगेटिव्ह की पॉझिटीव्ह हा वाद एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल दहा तास सुरू राहिला. यामुळे प्रसूतीसाठी दवाखानाच उपलब्ध न झाल्याने अखेर एका दवाखान्याच्या दारातच तिची प्रसूती झाली आणि दहा तासाच्या वेदना तिथेच संपल्या.

जिल्ह्यातील आजरा येथील हा खळबळजनक प्रकार काल रात्री घडला. आजरा शहरानजीक सालगाव येथील एका महिलेचे गडहिंग्लज तालुक्यात सासर आहे. त्यामुळे सासरी तिची प्रसूतिपूर्व तपासणी सुरू होती. काल पहाटे तिच्या पोटात दुखू लागल्यामुळे तिला उपचारासाठी गडहिंग्लज येथील एका रुग्णालयात नेण्यात आले. त्यांनी करोनाची तपासणी करून या असे सांगून तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. तिथूनच त्या महिलेची फरफट सुरू झाली. करोनाची तपासणी करून घेतल्यानंतर अहवाल घेऊन ती अनेक दवाखान्यात गेली पण तिला उपचारासाठी कोणीही दाखल करून घेतले नाही. नेसरी मधील ग्रामीण रुग्णालयात गेले पण तिथे शिजरिंगसाठीची यंत्रणा नसल्याने या रुग्णालयाने तिला दाखल करून घ्यायला नकार दिला. त्यानंतर तिने अनेक दवाखान्यात जाऊन उपचारासाठी दाखल करून घेण्याची विनंती केली पण प्रत्येक ठिकाणी तिच्या अहवालाबाबत शंका व्यक्त करण्यात आली. त्यातून उपचारासाठी दाखल करून घेतले नाही.

दिवसभर गडहिंग्लजमध्ये फिरल्यानंतर कुठेही दवाखाना मिळत नाही म्हटल्यानंतर शेवटी नातेवाईकांनी तिला आजरा येथे आणले. आजरा येथील एका डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास संमती दिली. पण त्याच वेळी त्यांच्या दवाखान्यात आणखी एका महिलेच्या प्रसूतीसाठी शिजरिंग सुरू होते . या काळात तिच्या पोटात अधिक दुखू लागले आणि दवाखान्याच्या दारातच तिची प्रसूती झाली. प्रसूतीनंतर तिचा अहवाल पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हा वाद पुन्हा सुरू झाला. दिलेल्या अहवालाचा कागद फाटल्यामुळे वाद वाढत गेला. इतर रुग्णांची काळजी मला घ्यायला हवी असे म्हणत त्या डॉक्टरने तिला दवाखान्यात घेण्यास विरोध केला . त्यामुळे रात्री दहा वाजता बाळासह तीला गडहिंग्लज येथील कोविड सेंटर मध्ये पाठवण्यात आले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here