परशुराम घाटातील एक लेन यापूर्वीच पूर्ण झाल्याने महामार्गावरील या घाटात येथील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागला आहे. पूर्वी हा घाट पार करण्यासाठी लागणारा २० ते २५ मिनिटांचा कालावधी आता केवळ दहा मिनिटांवर आला आहे. चिपळूण तालुक्यातील परशुराम घाट ते संगमेश्वर तालुक्यातील आरवली दरम्यानच्या ३६ किलोमीटर अंतरात केवळ सव्वा किलोमीटरचे काँक्रीटीकरण शिल्लक आहे. गणेशोत्सवापूर्वी उर्वरित काम मार्गी लागल्यास चिपळूण हद्दीत महामार्गावरील प्रवास सुखकर होऊ शकतो.
घाटातील चिपळूण हद्दीतील इगल इन्फ्रा कंपनीने याआधीच काम पूर्ण केले. परंतु खेड हद्दीतील कल्याण टोलवेज कंपनी मार्फत सुरू असलेले काम एका अवघड वळणावर येऊन गेले काही दिवस रखडले होते. याठिकाणी २२ मिटरहून अधिक उंच दरडीचा भाग असल्याने व तेथे कठिण कातळ लागल्याने कामाचा वेग मंदावला होता. पण आता कातळ फोडण्याचे काम पूर्ण झाल्याने ठेकेदारानेही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे
कामाला गती मिळण्यासाठी आधी पावसाळ्यात महामार्गावर आलेली दरडीची माती हटविण्यात येत आहे. त्यानंतर काँक्रिटीकरणाचे कामही तातडीने हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मागिल तीन दिवस सातत्याने सपाटीकरणाचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत काँक्रीटीकरण पूर्ण करून घाटातील दोन्ही मार्ग वाहतुकीस मोकळ्या करण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.
परशुराम घाटातील काँक्रीट रस्त्याला गेलेले तडे बुजवण्यात आले आहेत. परशुराम घाटातील माथ्यावरचे काँक्रीटीकरण अत्यंत घाईघाईने पूर्ण करण्यात आले. मात्र पहिल्याच पावसात त्यातील काही भाग खचला. त्यामुळे नव्याने केलेल्या काँक्रीटीकरणाला जागोजागी तडे गेले होते. मात्र आता पाऊस कमी होताच हे तडे खास ‘लिक्विड मटेरियल’ने बुजविण्यात आले आहेत.
पेढे व परशुरामवासियांचा प्रश्न जैसे थे
परशुराम घाट हा गेले काही महिने चर्चेचा विषय ठरला आहे.या घाटात चुकीच्या पद्धतीने डोंगरकटाई करण्यात आल्याने पेढे व परशुराम या गावातील काही घरांना धोका निर्माण झाल्याचा आरोप यापूर्वीच येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे. या कामाच्या बेजबाबदारपणामुळेच पेढे व परशुराम येथील काही घरांना महसूल विभागाकडून दरवर्षीच्या पावसाळ्यात स्थलांतरित होण्याच्या नोटिसा येऊ लागल्या आहेत अशी माहिती पेढे व परशुराम येथील ग्रामस्थांनी दिली आहे. त्यामुळे आजही पेढे व परशुराम येथील काही ग्रामस्थ पावसाळा सुरू झाला की जीव मोठी धरूनच राहत आहेत अशी प्रतिक्रिया काही जाणकार ग्रामस्थांनी दिली आहे