म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘सकारात्मक विचारसरणीचा पगडा असल्यामुळे मी आजही तरुणाईच्या मनातील मुख्यमंत्री आहे. त्यामुळे या कार्यक्रमात ‘मी पुन्हा येईन,’ अशी मिश्किल टिपण्णी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त चिंचवड येथील कर्तव्य फाउंडेशनतर्फे आयोजित ‘मोरया यूथ फेस्टिव्हल-२०२०’चे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी फडणवीस यांची मुलाखत घेतली. त्या वेळी ते बोलत होते. महापौर माई ढोरे, खासदार अमर साबळे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, संयोजक राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, माजी मंत्री बाळा भेगडे या वेळी उपस्थित होते. मुलाखतीत फडणवीस यांनी सोलापूरकर आणि उपस्थित युवक-युवतींच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

ते म्हणाले, ‘मी कोणतेही काम प्रामाणिकपणे आणि सकारात्मक विचाराने करतो. मी विरोधी पक्षनेता होतो, त्या वेळी फक्त समस्या मांडल्या नाहीत, तर त्या समस्यांवर उपाय सांगितले. मुख्यमंत्री झाल्यानंतर समस्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन काम केले. मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात जनतेचे आशिर्वाद मिळाले. त्याचे बळ अजूनही आहे. त्यामुळे आजही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? असे विचारताच तरुणाईच्या डोळ्यांपुढे माझीच प्रतिमा दिसते. त्यामुळे ‘मी पुन्हा येईन’ असा आशावाद व्यक्त करतो.’

सभाधीट होण्यामागील यशाचे रहस्य नमूद करताना फडणवीस म्हणाले, ‘कॉलेजच्या काळात वादविवाद स्पर्धेत प्रथम अपयश आले होते. त्यानंतर एका मित्राने मंचावर गेले की जगातील सर्व मुर्ख आपल्यासमोर बसले आहेत, असे समजून बोलायचे, असा सल्ला दिला. त्यानंतर स्पर्धेत मी प्रथम क्रमांक मिळविला. परंतु, तो सल्ला खोटा वाटू लागला आहे. आता वाटते आपणच मूर्ख आहोत.’

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळातील कामांचा आढावा घेताना फडणवीस म्हणाले, ‘जागतिक पातळीवर आर्थिक मंदी असताना भारताचा विकास दर पाच टक्के आहे. गेल्या पाच वर्षांत सरकारने पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उभारल्या. सक्षम करप्रणाली लागू केली. त्यामुळे पुढील १५ वर्षांचा काळ देशासाठी ‘मेक अँड ब्रेक’ राहील. देश विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत बसेल. उत्पादन क्षेत्र वाढत आहे. शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे. त्यासाठी जागतिक बँकेच्या साह्याने पाच हजार गावांमध्ये नवे तंत्रज्ञान वापरून शेतीवर प्रयोग केले जातात. उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत.’ अॅड. सचिन पटवर्धन यांनी प्रास्तविक केले. प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी आभार मानले.

‘सूर कळला असता तर…’

‘माझी किशोरकुमार यांच्या पासूनची गाणी पाठ आहेत. परंतु, मला सुरामध्ये गाता येत नाही. माझा सूर लग्नाअगोदर पत्नीला कळाला असता, तर तिने माझ्याशी लग्नच केले नसते,’ असे हजरजबाबी उत्तर देऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात हास्याचे कारंजे फुलविले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here