म. टा. प्रतिनिधी, पुणेः राज्य सरकारने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (एमटीडीसी) रिसॉर्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला असला, तरी पुणे विभागातील सहा रिसॉर्टपैकी आणि पानशेत या परिसरात करोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त असल्याने ही रिसॉर्ट बंद ठेवण्यात येणार आहेत. उर्वरित रिसॉर्टचे ऑनलाइन बुकिंग सुरू करण्यात आले आहे.

‘पुणे विभागात महाबळेश्वर आणि पानशेतसह माथेरान, माळशेज, कार्ला आणि भीमाशंकर या सहा ठीकाणी ‘एमटीडीसी’ची रिसॉर्ट आहेत. मात्र, महाबळेश्वर आणि पानशेत या परिसरात करोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त असल्याने ही रिसॉर्ट काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या आदेशानंतर उर्वरित चार ठिकाणची रिसॉर्ट खुली करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे’ असे पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी सांगितले.

’राज्य सरकारने जिल्ह्यांतर्गत प्रवासाला मान्यता दिल्याने पर्यटनाला चालना मिळेल. लॉकडाउननंतर आतापर्यंत रिसॉर्ट बंद असल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे हे नुकसान भरून काढण्यासाठी कर्मचारी हे काही महिने अतिरिक्त काम करणार आहेत’ असे हरणे यांनी स्पष्ट केले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर ‘एमटीडीसी’कडून घेण्यात आलेली खबरदारी आणि सुविधांची माहिती पर्यटकांना संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तसेच पर्यटन विषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहिती आहे. खुले करण्यात आलेल्या रिसॉर्टचे ऑनलाइन बुकिंग सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, ‘एमटीडीसी’कडून लॉकडाउनच्या काळातही रिसॉर्टचे निर्जंतुकीकरण करण्यात येत होते. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना केल्या आहेत. पर्यटकांची शरीर तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाइज करणारे स्प्रे, शरीरातील प्राणवायूचे प्रमाण मोजणारे यंत्र आदी व्यवस्था करण्यात आली आहे. रिसॉर्टमध्ये येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here