सार्वभौम सुवर्ण रोखे नवीन मालिका
आरबीआय चालू आर्थिक वर्षासाठी सार्वभौम गोल्ड बाँड योजनेची दुसरी मालिका ११ सप्टेंबर रोजी जारी करेल आणि इच्छूक ग्राहक ११ ते १५ सप्टेंबर या कालावधीत सार्वभौम गोल्ड बाँड खरेदी करू शकतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी सांगितले की सार्वभौम गोल्ड बाँडच्या पुढील हप्त्यासाठी प्रति ग्रॅम ५,९२३ रुपये इश्यू किंमत निश्चित करण्यात आली आहे.
SGB ऑनलाईन खरेदीवर सूटसार्वभौम सुवर्ण रोखे ऑनलाइन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल माध्यमातून पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना दर्शनी मूल्यावरून ५० रुपये प्रति ग्रॅम सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बाँड्सची इश्यू किंमत ५,८७३ रुपये प्रति ग्रॅम ठेवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे सार्वभौम सुवर्ण रोखे सरकारच्या वतीने आरबीआयद्वारे जारी केले जातात, त्यामुळे त्याला सरकारी हमी असते. सरकारने नोव्हेंबर २०१५ मध्ये सार्वभौम गोल्ड बाँड योजना सुरू केली, ज्याच्यावर वार्षिक २.५% व्याज मिळते. हे पैसे दर ६ महिन्यांनी गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात जमा केले जातात. सार्वभौम सुवर्ण बाँड योजनेत एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त चार किलो सोन्याचे रोखे खरेदी करू शकते तर एक ग्रॅम किमान गुंतवणूक मर्यादा आहे.
सार्वभौम सुवर्ण रोख्यांचा कालावधी
सार्वभौम गोल्ड बाँडचा परिपक्वता कालावधी आठ वर्षांचा आहे. तथापि गुंतवणूकदार मुदतपूर्तीपूर्वी पण पाच वर्षानंतर पैसे काढू शकतात. म्हणजे गुंतवणूकदारांना या बाँडमधील त्यांची गुंतवणूक किमान पाच वर्षे टिकवून ठेवावी लागेल. बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नियुक्त पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंज BSE आणि NSE द्वारे रोख्यांची विक्री केली जाईल.