आतापर्यंत वेलचीचा सर्वाधिक वापर मसाल्यासाठी केला जात होता आणि आताही तो केला जात आहे. मात्र गेल्या काही वर्षांत वेलचीचा वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमध्ये वापर वाढला आहे. पूर्वी केवळ मसाल्यासाठी वापरली जाणारी वेलची आता विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांत, दुग्धजन्य पदार्थांसाठी, मुखवास, तेल काढण्यासाठीही वापरली जात आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा वेलचीला मागणी वाढली आहे.
वेलचीचे उत्पादन केरळ राज्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शेतकरीच को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून वेलचीचा लिलाव करतात आणि रोख व्यवहार करतात. ऑगस्ट ते फेब्रुवारी हा वेलचीचा मुख्य हंगाम असला तरी सध्या वर्षभर वेलचीचे उत्पादन घेतले जात आहे. मात्र यावर्षी पावसाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने वेलचीचे उत्पादन कमी झाले आहे. मात्र इतर ठिकाणच्या वेलचीच्या मानाने भारतीय वेलचीचा सुगंध अधिक असल्याने या वेलचीलाच आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय वेलची पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे वेलचीची निर्यात आपल्याकडून अधिक होते. भारतीय वेलचीच्या स्पर्धेत अमेरिकेतील ग्वाटेमाला वेलचीदेखील आहे, मात्र आपल्या वेलचीचे गुणधर्म तिच्यात अजूनही आलेले नाहीत. त्यामुळे अरब, मध्य पूर्वेकडील देशांत भारतीय वेलचीला मोठी मागणी आहे. तसेच, सध्या दुग्धजन्य पदार्थ जसे श्रीखंड, लस्सी, मिठाई, आईस्क्रीम, फ्लेवर्ड मिल्क यांसह मुखवास आणि वेलचीचे तेल मिळवण्यासाठी हॉटेल उद्योगात वेलचीचा वापर वाढला आहे. त्यामुळे वेलचीच्या मागणीत वाढ झाली आहे, अशी माहिती मुंबईतील वेलचीचे मोठे व्यापारी मनन देसाई यांनी दिली.
मागील वर्षात भारतात वेलचीचे उत्पादन ३५ ते ३८ हजार टन इतके झाले होते. मात्र यावर्षी हे उत्पादन ३० हजार टन इतकेच झाले आहे. पावसाचा लहरीपणाचा फटका बसल्याने ज्यावेळी पावसाची गरज होती, त्यावेळी पाऊस आला नाही. त्यामुळे उत्पादनात घट झाल्याने काही प्रमाणात दर वाढले आहेत. मात्र या वाढत्या दराने वेलची उत्पादकांना फायदा झाला आहे. आपल्याकडे पानभर वेलची या जातीचे उत्पादन घेतले जाते. त्यात मिडीयम, गोल्ड हे प्रकार येतात.
– कीर्ती राणा, अध्यक्ष, नवी मुंबई मर्चंट चेंबर
वेलचीचे घाऊक दर
पानभर वेलची – सुमारे १५०० रुपये किलो
मीडियम वेलची – २२०० रुपये किलो
गोल्ड नंबर एक वेलची – ३००० रुपये किलो