वृत्तसंस्था, लंडन: ‘भारतातील लोकशाही संस्थांवर चौफेर हल्ला सुरू आहे. देशाच्या लोकशाही संरचनेला धक्का देण्याच्या या प्रयत्नांवर युरोपीय महासंघात चिंता व्यक्त केली जात आहे,’ असा आरोप सध्या युरोप दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला.

राहुल गांधी यांचा युरोप दौरा बेल्जियममधून सुरू झाला आहे. या दौऱ्यादरम्यान ब्रसेल्स येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भारतातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली. रशिया-युक्रेन युद्धासह विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले. तसेच, रशिया-युक्रेन युद्धाबाबत मोदी सरकारच्या सध्याच्या भूमिकेशी विरोधी पक्ष सहमत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, भारतात भेदभाव आणि हिंसाचारात वाढ होत असल्याचा दावा करीत, लोकशाही संस्थांवर चौफेर हल्ला सुरू आहे, असा आरोपही राहुल यांनी केला.

काही मुद्द्यांवर युरोपीय संसद सदस्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, असा प्रश्न पत्रकारांना राहुल यांना विचारला. त्यावर, ‘ते खूप चिंतित होते. आमच्याप्रमाणेच त्यांनाही वाटते की, भारताच्या लोकशाही संरचनेची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जात आहे,’ असे उत्तर राहुल यांनी दिले. युरोपीय दौऱ्याच्या सुरुवातीला आपले युरोपीय संसद सदस्यांशी फलदायी संभाषण झाले. भारतातील विरोधकांच्या दृष्टिकोनातून जगभर प्रवास करण्याच्या आणि विचारांची मुक्त देवाणघेवाण करण्याच्या व्यापक उपक्रमाचा हा एक भाग आहे, असेही राहुल म्हणाले. ‘युरोपीय संसद सदस्यांशी चर्चेदरम्यान मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दाही लोकशाही अधिकार, लोकांमधील सौहार्द आणि शांतता या दृष्टिकोनातून मांडण्यात आलेल्या विषयांपैकी एक होता,’ असेही राहुल यांनी सांगितले.

मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यासाठी सरकारनं काय केलं? अमित शाहांनी संसदेत दिलं उत्तर

‘राहुल गांधी हे भारतीय राजकारणातील सध्याचे मीर जाफर आहेत. जे भारतात नवाब बनण्यासाठी परदेशी सैन्याची मदत घेण्यासाठी परदेशात जातात. परदेशात जाऊन भारताबद्दल टिप्पण्या करून ते देशाचा अपमान आणि बदनामी करतात. भारताचा अशाप्रकारे अपमान करण्याचा अधिकार त्यांना भारतीयांनी दिलेला नाही,’ अशी टीका सत्ताधारी भाजपने यापूर्वी केली होती. काश्मीरसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर राहुल म्हणाले, ‘हा प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे त्यात अन्य कोणी हस्तक्षेप करण्याची गरज नाही.’

भारतात अल्पसंख्यकांवर हल्ले होत आहेतच; परंतु इतर अनेक समुदायांवरही असेच आक्रमण होत आहे. त्यात दलित, आदिवासी, मागासवर्गीय समाजांचा समावेश आहे. आमच्या देशाचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न होत आहे.

– राहुल गांधी, काँग्रेस नेते

मोठी बातमी : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बेड्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here