वृत्तसंस्था, लखनौ/ आगरतळा: सहा राज्यांमधील विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तीन जागा राखल्या. उर्वरित चार जागांमध्ये काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा आणि तृणमूल काँग्रेसने प्रत्येकी एक जागा जिंकली. उत्तर प्रदेशातील घोसी येथील लक्षवेधी लढतीत समाजवादी पक्षाने (सप) आपली जागा कायम राखली.

त्रिपुरातील दोन आणि उत्तराखंड, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि झारखंडमधील प्रत्येकी एक विधानसभा जागेसाठी मंगळवारी मतदान झाले होते. त्याचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. स्थानिक आमदारांचे निधन आणि दोन आमदारांनी राजीनामा दिल्याने तेथे पोटनिवडणुका घ्याव्या लागल्या होत्या.

उत्तराखंडमधील बागेश्वर; तसेच त्रिपुरातील धनपूर आणि बॉक्सानगर अशा तीन ठिकाणी भाजप उमेदवार निवडून आले. त्रिपुरामध्ये काँग्रेस आणि तिपरा मोटा पक्ष यांच्यासोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) हातमिळवणी केली होती. मात्र, त्याचा कोणताच फायदा या पक्षाला होऊ शकला नाही. पश्चिम बंगालमधील धुपगिरी येथे तृणमूल काँग्रेसने भाजपसह काँग्रेस-माकप आघाडीला नमवले. झारखंडमध्ये सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाने (झामुमो) भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील ऑल झारखंड स्टुडंटस्‌ युनियन (आजसू) या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला. केरळमधील पुथूप्पल्ली येथील जागा सत्ताधारी ‘माकप’ला काँग्रेसकडून हिसकावून घेणे शक्य होऊ शकले नाही. दिवंगत माजी मुख्यमंत्री उम्मन चंडी यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली होती. तेथे काँग्रेसने चंडी यांचे पुत्र अॅड. चंडी ओमन यांना उमेदवारी दिली होती.

कोणतंही काम करत नाहीत, फक्त छापलं जातंय; नितीश कुमार यांचा मोदी सरकारवर घणाघात

त्रिपुराच्या निकालानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी ‘घमंडी आघाडीचा जनतेने पराभव केला,’ अशी प्रतिक्रिया दिली. ‘झामुमो’ आणि ‘सप’ने आपापले गड राखण्यात यश मिळविले. त्या पार्श्वभूमीवर ‘सकारात्मक राजकारणाने नकारात्मक राजकारणावर मात केली आहे. ‘इंडिया’ची भारतातील ही विजयी सुरुवात आहे,’ असे मत ‘सप’चे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिली.

‘माकप’ची हानी

आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहा राज्यांमधील पोटनिवडणुकांकडे गांभीर्याने पाहिले जात होते. पोटनिवडणुकीपूर्वी सातपैकी भाजपकडे तीन जागा होत्या. तर उर्वरित चारपैकी काँग्रेस, सप, माकप आणि झामुमो’कडे प्रत्येकी एक जागा होती. यातील त्रिपुरातील ‘माकप’ची जागा भाजपकडे गेली. मात्र, पश्चिम बंगालमधील भाजपकडील जागा ‘तृणमूल’ने खेचून घेतली.

असे लागले निकाल

मतदारसंघ-विजयी उमेदवार (पक्ष)

– धनपूर (त्रिपुरा) : बिंदू देबनाथ (भाजप)

– बॉक्सानगर (त्रिपुरा) : तफज्जल हुसैन (भाजप)

– बागेश्वर (उत्तराखंड) : पार्वती दास (भाजप)

– धुपगिरी (पश्चिम बंगाल) : निर्मल चंद्र राव (तृणमूल)

– दुमरी (झारखंड) : बेबी देवी (झामुमो)

– पुथूप्पल्ली (केरळ) : अॅड. चंडी ओमन (काँग्रेस)

– घोसी (उत्तर प्रदेश) : सुधाकरसिंह (सप)

मोठी बातमी : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बेड्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here