अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यानगर करावे अशी मागणी पुढे आली होती. मात्र, यासंबंधी विखे पाटील पिता-पुत्रांनी सावध प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी विखे पाटील यांचा नामांतरास विरोध असल्याचा आरोप करून जिल्ह्यात धनगर समजातर्फे यात्राही काढण्यात आली होती. ठिकठिकाणी विखे यांना निवेदन देऊन भूमिका स्पष्ट करण्यास सांगण्यात आले होते. अखेर विखे पाटलांची भूमिका जाहीर झालीच, शिवाय चौंडी येथील कार्यक्रमात स्वत: मुख्यमंत्र्यांनी नामांतराची घोषणा केली होती. त्यानंतर कार्यकर्त्यांचा विरोध मावळला होता.
आता धनगर आणि मराठा आरक्षणाच्या मागणीच्या निमित्ताने पुन्हा वाद पेटला आहे.विखे पाटील सोलापूर जिल्ह्याचेही पालक मंत्री आहेत. काल सोलापूर जिल्ह्यात धनगर आरक्षण कृती समितीचे शंकर बंगाळे या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री विखे पाटील यांना धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीचे निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला. मात्र या प्रकारानंतर तेथे उपस्थित विखे समर्थक कार्यकर्त्यांनी बंगाळे यांना मारहाण केली. या मारहाणीचा नगर जिल्ह्यातील धनगर समाजाने निषेध केला आहे. पोलिसांसमक्ष ही मारहाणा झाली असून संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा बंदचा इशाराही देण्यात आला. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला हे निवेदन दिले आहे.
याशिवाय राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेळी-मेंढी-मेष महामंडळाच्या जागेवरूनही वाद पेटल्याचे दिसून येत आहे. अर्थसंकल्पात हे महामंडळ पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे उभारण्याची घोषणा झाली आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, या महामंडळाची जागा बदलून ते अन्यथ नेण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत समाजात तीव्र असंतोष असून, समाजाचे नेते आमदार प्रा.राम शिंदे, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर यांनी विधान सभेच्या अधिवेशनात मंजूर केलेला विषय कोणाच्या सांगण्यावरुन बदलला जात आहे, याही खुलासा होण्याची गरज असल्याची मागणीही करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नामांतराच्यावेळी विरोध करणार्यांच्या विरोधात धनगर समाज आक्रमक असल्याने अशा घटना घडत आहेत, असा आरोपही करण्यात आला आहे. समाजातर्फे काका शेळके, सचिन डफळ, राजेन्द्र तागड, अध्यक्ष धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष निशांत दातीर, भगवान जऱ्हाड, अशोक होंनमने, केदार हजारे, संग्राम शेळके यांनी हे निवेदन दिले आहे.