चंद्रकांत विश्वनाथ पाटील (वय ५२, रा. वरद हॉस्पिटलजवळ, सांगली) असे मृताचे नाव आहे. चंद्रकांत पाटील यांना गंभीर जखमी अवस्थेत सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत आज रात्री उशीरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. चंद्रकांत पाटील हे कुपवाड येथील स्मित टाईल्स इंडस्ट्रीजचे संचालक होते. तसेच ते सांगली येथील लायन्स नॅब हॉस्पीटलचे विश्वस्त म्हणूनही कार्यरत होते. निसर्ग प्रेमी म्हणून त्यांचा लौकिक होता. याशिवाय मराठा उद्योजक फाउंडेशनचे ते सक्रीय कार्यकर्ते होते. यामाध्यमातून अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा.
गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास ते दुचाकीवरून कामानिमित्त बाहेर पडले. त्यावेळी काँग्रेस भवनजवळ आले असता समोरून भरधाव वेगाने दोघे तरूण दुचाकीवरून आले. त्यावेळी त्यांनी पाटील यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये ते रस्त्यावर जोरात आदळले. त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागला. चोवीस तास वर्दळ असणाऱ्या या रस्त्यावर अपघात झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली.
काही लोकांनी तातडीने त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या मृत्यूची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली.आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून गुन्हा नोंद केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. एका उद्योजकाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.