म. टा. विशेष प्रतिनिधी,

उकाड्यासोबतच मुंबईमध्ये रविवारी ठिकठिकाणी धुरकेही जाणवले. यामुळे मुंबईकरांमध्ये अस्वस्थताही अधिक होती. मुंबईची हवा पुन्हा एकदा प्रदूषित झाल्याची जाणीव रविवारच्या हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने करुन दिली. रविवारी मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक १०० वर पोहोचला होता. सोमवारीही हा निर्देशांक ९७ असण्याची शक्यता सफर या हवेची गुणवत्ता नोंदणाऱ्या प्रणालीतर्फे वर्तवण्यात आली आहे. रविवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील हा अती वाईट होता.

करोनाच्या लॉकडाउनच्या काळात ५० ते ६०च्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक नोंदला गेला होता. त्यानंतर रविवारी या निर्देशांकाने १०० चा आकडा गाठल्याने पुन्हा एकदा प्रदूषणाचा स्तर उंचावू लागल्याचे निदर्शनास आले. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक १०० असल्याने रविवारीही हवा समाधानकारक श्रेणीमध्येच नोंदली गेली. बोरिवली, मालाड, अंधेरी, वरळी, माझगाव येथे हवेचा दर्जा घसरुन मध्यम नोंदला गेला तर वांद्रे-कुर्ला संकुल येथे हा दर्जा अती वाईटपर्यंत खाली घसरला. मुंबईतील कुलाबा, चेंबूर आणि भांडुप या तीन केंद्रांवर हवेचा दर्जा समाधानकारक असल्याचे रविवारी नोंदले गेले. नवी मुंबईमध्येही हवेची गुणवत्ता समाधानकार असल्याचे नमूद करण्यात आले.

मुंबईत ६० टक्के वाढ

वांद्रे-कुर्ला संकुल येथे पीएम २.५ या प्रदूषकांची पातळी ३०४ नोंदली गेली. तर पीएम १० ची पातळी १२८ होती. बोरिवलीमध्ये पीएम १० आणि पीएम २.५ या दोन्हीची पातळी १३५ च्या पुढे होती, मालाडमध्ये पीएम २.५ ची पातळी १३५ होती तर पीएम १० ची पातळी १०६ होती. अंधेरीमध्ये पीएम २.५ ची पातळी १०१ नोंदली गेली. वरळीमध्ये ओझोनचे प्रमाण ११८ होते. तर माझगावमध्ये पीएम १० चे प्रमाण १०८ होते. सफरच्या माध्यमातून अनलॉक-१ आणि अनलॉक-४ यांची तुलना नोंदवण्यात आली आहे. यामध्ये अनलॉक-४ च्या काळामध्ये नायट्रोजन डायऑक्साइडच्या पातळीमध्ये मुंबईत ६० टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. दिल्ली, अहमदाबाद आणि पुणे या शहरांच्या तुलनेत मुंबईतील ही वाढ सर्वाधिक आहे. हे निरीक्षण १४ दिवसांसाठी करण्यात आले होते. अनलॉक-१ च्या १४ दिवसांपैकी १० दिवस पावसाचे होते, असे सफरतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

वाहतूकवाढीचा परिणाम
मुंबईतील प्रदूषणामध्ये वाढ होण्यासाठी प्रामुख्याने सध्या प्रदूषके वाहून नेणाऱ्या वाऱ्यांचा अभाव हे कारण आहे. मात्र, त्याचबरोबर अनलॉक-४ च्या काळामध्ये वाहतुकीमध्येही वाढ झाली आहे. पीएम २.५ आणि पीएम १० या सर्वात जास्त घातक प्रदूषकांमध्ये झालेल्या वाढीमुळे वाहतुकीने केलेला परिणामही अधोरेखित होत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here