माटुंगा पूर्वेकडील पारशी वसाहतीमध्ये ९० वर्षांचे वृद्ध आणि त्यांची ८० वर्षांची पत्नी राहते. त्यांची मुलगी अमेरिकेत वास्तव्यास असून अधूनमधून भेटण्यासाठी मुंबईत येते. आईवडिलांची देखभाल करण्यासाठी नोकर ठेवण्यात आले होते. घरखर्चासाठी मुलीने पालकांच्या नावाने बँक खाते उघडून देण्यात आले होते. या खात्याचे एटीएम कार्डही त्यांना देण्यात आले होते. दोघांचे मोबाइल क्रमांक आणि मुलीचा ई-मेल आयडी या बँक खात्याशी जोडण्यात आला होता.
जुलै महिन्यात त्यांची मुलगी ई-मेल तपासत असताना तिला बँकेतून आलेले अनेक ईमेल दिसले. दररोज दहा किंवा वीस हजार रूपये बँकेच्या खात्यातून काढण्यात आल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने याबाबत आईवडिलांकडे विचारणा केली असता आपण पैसे काढले नसल्याचे त्यांनी सांगितले. काहीतरी गडबड असल्याचे संशय आल्याने तिने बँकेशी संपर्क करून आर्थिक व्यवहार बंद करण्यास सांगितले.
वृद्ध दाम्पत्याची मुलगी भारतामध्ये आल्यानंतर तिने बँक गाठली. पैसे वेगवेगळ्या ठिकाणांहून काढण्यात आल्याचे निदर्शनास आले. मात्र हे कधी, कसे आणि कोणी काढले हे अद्याप कळू शकले नाही. त्यामुळे एटीएम कार्डचा गैरवापर केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे याचा तपास करण्यासाठी माटुंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.