अलीकडच्या काळात ठिकठिकाणीच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या दुधाचा उपयोग करत विविध पदार्थ बनवून ते बाजारात विकल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण स्वप्नील शिंदे या युवा शेतकऱ्याने घालून दिले आहे.
सराफवाडीच्या स्वप्नीलचा पन्नास गाईंचा गोठा आहे. या गाईंपासून दररोज सुमारे साडेचारशे ते पाचशे लिटर दूध मिळते. हे दूध डेअरीला न देता या दुधापासून पेढे, बासुंदी, खवा, कुल्फी, पनीर आधी पदार्थ बनवून ते बाजारात विकले जात आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने बनवलेल्या पदार्थांना विशेषता कंदी पेढे, साधे पेढे याला अधिकची मागणी होत आहे. स्वप्नीलने बनवलेल्या पदार्थांना सोलापूर, नगर , पुणे, इंदापूर, बारामती आदी भागातून मागणी होत असून तिकडे माल दिला जातो.
दूध उत्पादक शेतकऱ्यांनी कमी गाईत जास्तीचे उत्पादन मिळवण्यासाठी सिमेंसवर काम करावे. सिमेंस वापरायचे झाल्यास बायफमध्ये एबीएस मध्ये वापरू शकता. किंवा डब्ल्यू डब्ल्यू एस मध्ये वापरू शकता. तुम्ही सिमेंस मध्ये काम केल्यास कमीत कमी गाईंमध्ये जास्तीत जास्त दूध मिळू शकते. आणि जास्तीत जास्त दूध मिळालं तर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गोट्याचा खर्च कमी होऊ शकतो अशी माहिती शिंदे यांनी मटाशी बोलताना दिली.
मागील ३० वर्षांपासून दुधाचा व्यवसाय करूनही अपेक्षित पैसा हातात पडत नव्हता. यावर उपाय म्हणून मागील दीड वर्षांपासून घरच्याच गाईंच्या दुधापासून विविध पदार्थ बनवून ते बाजारात विकल्याने या युवा शेतकऱ्याला भरघोस नफा शिल्लक राहत आहे. त्यामुळे इतरही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी अधिकचा नफा मिळविण्याच्या दृष्टीने शिंदे या युवा शेतकऱ्याप्रमाणे प्रयोग करायला हरकत नाही.
शेतकरी तरुणांनो गुणवत्तेवर काम करा
दूध प्रक्रिया उद्योग सुरू केल्याने मला माझ्या दुधाच्या दराची कधी चिंता राहिली नाही. आज मी पनीर, पेढा, कुल्फी असे उपपदार्थ बनवून त्याची विक्री करत आहे. गुणवत्ता चांगली असल्याने माझ्या पुरवठ्यापेक्षा मला मागणी अधिक आहे, अशी माहिती सराफवाडी येथील तरुण दुग्ध व्यवसाय शेतकऱ्याने दिली.