वृत्तसंस्था, नवी दिल्ली

नोकरदारांमध्ये सर्वाधिक वेतन घेणाऱ्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी अव्वल स्थान पटकावले असून, सर्वाधिक वेतन देणाऱ्या शहरांमध्ये आयटी नगरी बेंगळुरूने यंदा बाजी मारून ‘हॅट्‌ट्रिक’ लाधली आहे. २०१७ आणि २०१८मध्येही सर्वाधिक वेतन देणाऱ्या शहरांच्या यादीतही बेंगळुरूच अव्वल होते.

‘रँडस्टँड इनसाइट्स सॅलरी ट्रेंड्स रिपोर्ट २०१९’ या अहवालात नमूद केल्याप्रमाणे बेंगळुरूमधील कनिष्ठ कर्मचाऱ्याला वार्षिक ५.२७ लाख रुपये, त्यापेक्षा अधिक अनुभवी कर्मचाऱ्याला वार्षिक १६.४५ लाख रुपये आणि वरिष्ठ कर्मचाऱ्याला वार्षिक ३५.४५ लाख रुपये वेतन मिळत आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या गटात वार्षिक ५ लाख रुपये आणि ४.५९ लाख रुपयांचे वेतन देऊन हैदराबाद आणि मुंबई यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे. मध्यम गटातील कर्मचाऱ्यांच्या गटात वार्षिक १५.०७ लाख रुपये आणि १४.५ लाख रुपयांचे वेतन देऊन मुंबई आणि नॅशनल कॅपिटल रिजनने दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे. या शिवाय मुंबई आणि पुण्याने वार्षिक ३३.९५ लाख रुपये आणि ३२.६८ लाख रुपये वेतन देऊन अतिवरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या गटात दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे.

या शिवाय कनिष्ठ विभागात आणि अतिवरिष्ठ गटात अनुक्रमे ४.९६ लाख रुपये आणि ३५.८४ लाख रुपयांचे वार्षिक वेतन देण्याचाही मान माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने मिळवला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रापाठोपाठ अतिवरिष्ठ गटातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक वेतन देण्यामध्ये डिजिटल मार्केटर्स क्षेत्राने (३५.६५ लाख रुपये) दुसरा क्रमांक मिळवला आहे. सर्वाधिक वार्षिक वेतन देणाऱ्या क्षेत्रांमध्ये क्लाउड, प्रोडक्ट मॅनेजमेंट, अॅनालिटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशन आदींचा समावेश होत असल्याचे दिसून आले आहे. येत्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रांची वाढ अन्य कोणत्याही क्षेत्रापेक्षा अधिक राहणार असल्याचेही ‘रँडस्टँट’ने अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दोन वर्षांपूर्वी वस्तू आणि सेवा कर लागू (जीएसटी) झाल्यापासून अकाउंटंट, व्यवस्थापन सल्लागार आणि वकील आदी व्यावसायिकांच्या वेतनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या क्षेत्रातील कनिष्ठ आणि वरिष्ठ दर्जाचे कर्मचारी आयटी क्षेत्रानंतर सर्वाधिक वेतन घेत असल्याचे आढळून आले आहे.

‘हॉट जॉब्ज फॉर २०१९’ या अंतर्गत केलेल्या विशेष सर्वेक्षणात सर्वच उद्योगांतील नोकऱ्यांची संख्या हळूहळू का होईना वाढत असून, सहा ते दहा वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला तुलनेने अधिक वेतन मिळत असल्याचे आढळून आले आहे.

मशिन लर्निंग क्षेत्रात अधिक संधी

गेल्या काही वर्षांमध्ये डेटा सायन्स या क्षेत्राची नव्याने ओळख होत असून, मशिन लर्निंगशी संबंधित असणाऱ्यांची मागणी वाढत असल्याचेही दिसून आले आहे. पायथन स्पेशालिस्ट आणि हडूप स्पेशालिस्ट असणाऱ्यांना अनुक्रमे वार्षिक २०.२४ लाख रुपये आणि १९.०१ लाख रुपयांचे पॅकेज मिळत असल्याचेही ‘रँडस्टँड’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here