म. टा. विशेष प्रतिनिधी,

महापालिकेच्या अथक मेहनतीने नियंत्रणात आलेला पुन्हा डोके वर काढू लागला आहे. गणेशोत्सवात नागरिकांच्या भेटीगाठी वाढल्याने करोनाचे रुग्ण वाढत असल्याचे समोर आले असून सप्टेंबरअखेरपर्यंत रुग्णवाढीचा वेग कायम राहण्याची शक्यता पालिकेने वर्तवली आहे. गेल्या महिनाभरात सरासरी एक हजार नोंदवल्या गेलेल्या रुग्णसंख्येत २७ ऑगस्टपासून वाढ होत आहे. दररोज हजार ते १२०० पर्यंत वाढणारी रुग्णसंख्या मागील काही दिवसांत दीड ते दोन हजारांपर्यंत वाढू लागल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. शिवाय रुग्णदुपटीचा कालावधी ८० दिवसांवरून ७७ दिवसांवर घसरला आहे.

मुंबईत पालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे करोनाची साथ नियंत्रणात आली आहे. ६ सप्टेंबरपर्यंत मुंबईत एकूण एक लाख ५० हजारांहून अधिक रुग्ण नोंदवले गेले असून यातील १ लाख २३ हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे मुंबईत आता सुमारे २२ हजार रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. यातील ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांना करोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे तेही लवकरच बरे होऊन घरी परततील, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर, दुसरीकडे गणेशोत्सव काळात करोना वाढला असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. सध्या मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के असले तरी रुग्णदुपटीचा कालावधी कमी झाला आहे. ८० दिवसांवर गेलेला हा कालावधी खाली येऊन ७७ दिवस झाला आहे.

नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू

मुंबईत करोना नियंत्रणात असल्याने राज्य सरकार व पालिकेने नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. या शिथिलतेने गणेशोत्सवात करोना रोखण्यासाठी नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेतली नाही. परिणामी संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. उत्सवादरम्यान करोनाबाधितांशी निकटचा संपर्क आल्याने रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. ही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

येत्या काळात मुंबईत करोना वाढू नये यासाठी पालिकेच्या पातळीवर सर्व खबरदारी घेतली जाते आहे. आत्तापर्यंत दररोज सहा हजार करोना चाचण्या होत होत्या, ती संख्या आता दहा हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे जास्त रुग्ण आढळून तातडीने उपाययोजना करता येईल. रुग्ण वाढले तरी पालिकेची यंत्रणा सक्षम असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनीही व्यक्त केली चिंता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पालिकेचे सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, वैद्यकीय अधीक्षक, अधिष्ठाता यांच्यासोबत शनिवारी झालेल्या बैठकीत मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली. ‘अनलॉक केल्यानंतर मुंबईत करोनाचा वाढता प्रादुर्भाव ही काळजीची गोष्ट असली तरी मुंबई पालिकेची सक्षम तयारी पाहिल्यानंतर मला खात्री आहे की, आपण हा प्रादुर्भाव चांगल्या रीतीने रोखू’, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. ‘आपण धारावी आणि वरळीत करून दाखविले, त्यासाठी आपले कौतुक झाले; पण हुरळून न जाता, ढिलाई न दाखवता अधिक जोराने काम करा. दिवसाला एक हजार किंवा ११०० रुग्ण सापडत असताना आपण या साथीच्या शिखरावर आहोत, असे वाटत होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून १९०० आणि १७०० रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पुढील दोन-तीन महिने हे आव्हान आपल्याला अधिक समर्थपणे पेलायचे आहे’, असे आवाहन त्यांनी केले.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’

करोनाचा झोपडपट्टी व वसाहतीत वाढलेला प्रादुर्भाव आता उंच इमारती, मोठ्या सोसायट्या आणि उच्चभ्रू वस्तीत मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. ८० ते ८५ टक्के रुग्ण या भागातून आहेत. करोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारतर्फे १५ सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही राज्यस्तरीय मोहीम सुरू करण्यात येणार आहे. मुंबईत ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे यांची मदत घ्या, त्यांना सहभागी करून घ्या, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना या बैठकीत दिले.

मुंबईत मृत्युदर घसरला

मुंबईत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृत्युदर कमी होत आहे. जूनमध्ये ५.५७ टक्के, जुलैमध्ये ४.८८ टक्के, ऑगस्ट ४.०७ टक्के आणि सप्टेंबरमध्ये २.६ टक्के इतका झाला आहे. साथ खूप वेगात असताना मुंबई महापालिका व सार्वजनिक रुग्णालयांत मृत्युदर ८२ टक्के होता, तो आता ५९ टक्के इतका कमी झाला. तर, खासगी रुग्णालयांत पूर्वी कमी असलेला १८ टक्के मृत्युदर वाढून ३९ टक्के झाल्याची माहिती पालिका आयुक्त यांनी दिली.

अशी झाली रुग्णवाढ

२३ ऑगस्ट : ९३१

२४ ऑगस्ट : ७४३

२५ ऑगस्ट : ५८७

२७ ऑगस्ट : १,३५०

२८ ऑगस्ट : १,२१७

२९ ऑगस्ट : १,४३२

३० ऑगस्ट : १,२३७

३१ ऑगस्ट : १,१७९

१ सप्टेंबर : १,१४२

२ ऑगस्ट : १,६२२

३ ऑगस्ट : १,५२६

४ सप्टेंबर : १,९२०

५ सप्टेंबर : १,७३५

६ सप्टेंबर : १,९१०

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here