१ ऑक्टोबर २०१७ साली तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काकडी गावात शिर्डी विमानतळाचं उद्घाटन झालं. विमानतळ सुरू होऊन ६ वर्ष झाले असून दररोज देशभरातील अनेक उड्डाणे या विमानतळावरून होत आहे. मात्र महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने स्थानिक ग्रामपंचायतचा तब्बल ७ कोटी २३ लाख २० हजार ६३६ रुपये कर थकवला आहे. अनेक वेळा ग्रामपंचायतने नोटीस पाठवून सुध्दा कराची रक्कम मिळत नसल्याने सरपंच पूर्वा रवींद्र गुंजाळ यांनी उध्दव ठाकरेंना निवेदन देऊन कराची रक्कम मिळवून देण्याची विनंती केली.
शिर्डी विमानतळ सुरू झाल्यापासून विमानतळ विकास प्राधिकरणाने काकडी मल्हारवाडी ग्रामपंचायतचा एकही रुपया कर दिलेला नाही. आत्तापर्यंत सव्वा सात कोटींची थकबाकी आहे. आमच्या काकडी गावातील शेतकऱ्यांनी विमानतळासाठी दीड हजार एकर जमीन कवडीमोल भावात दिली. त्यावेळेस आम्हाला विकासाची अनेक आश्वासने दिली गेली. मात्र ती पूर्ण करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने आमच्या ग्रामपंचायतचे सव्वा सात कोटी दिले तर विकासाची अनेक कामे गावात करता येतील. त्यामुळे लवकरात लवकर आमच्या ग्रामपंचायतीला कराची रक्कम मिळावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कानीफ गुंजाळ यांनी केली आहे.